आयात नेतृत्व कसे चालते?

sharad-pawar1
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना, श्री. शरद पवार यांनी आता देशातल्या पुरोगामी पक्षांचे नेतृत्व करावे असे निमंत्रण त्यांना दिले आहे. देशातल्या पुरोगाम्यांना नेतृत्व देण्यास कोणी शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे कॉंग्रेसमधून आलेले एक नेतृत्व त्यांना असे आयात करून घ्यावे लागत आहे. हे पुरोगाम्यांच्या अधःपतनाचे लक्षण आहे. भाई वैद्य म्हटल्याबरोबर १९७९ च्या महाराष्ट्रातल्या पुलोद सरकारचे गृहमंत्री आठवतात. भाई वैद्य यांना गृहमंत्री म्हणून लाच देण्यासाठी एक व्यक्ती आली होती. परंतु भाई वैद्य यांनी ती लाच स्वीकारण्याऐवजी लाच देणार्‍या माणसाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांच्या हाती दिले. त्यावेळी भाई वैद्य हे खरोखरच हिरो ठरले होते. मात्र घरी चालून आलेले एवढे पैसे नाकारणारे भाई वैद्य आता शरद पवार यांनी आपले नेतृत्व स्वीकारावे म्हणून त्यांच्यासमोर याचना करत आहेत ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. भाई वैद्य यांनी पवारांकडे अशी याचना करावी अशी पवारांची लायकी नाही म्हणून भाई वैद्य यांच्या याचनेचे वाईट वाटते.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि खुद्द शरद पवार यांची केवळ भ्रष्टाचार या एका विषयावर जरी भाई वैद्य यांच्याशी तुलना केली तर किती फरक आढळतो? आज राष्ट्रवादी कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे प्रचंड भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. तिथे त्यांच्यावर दर आठवड्याला एक या क्रमाने नवनवे आरोपपत्र दाखल होत आहे. भाई वैद्य यांनी ज्या साधन शुचितेचा जन्मभर आग्रह धरला तिच्या पार्श्‍वभूमीवर छगन भुजबळ यांच्या संपत्तीचा विचार केला तर भुजबळांची राहणी ही भाई वैद्य यांच्या तत्त्वांशी किती विसंगत आहे हे लक्षात येते. छगन भुजबळ हे गैर मार्गाने अमाप संपत्ती अर्जित करत आहेत ही गोष्ट पवारांना गेली १५ वर्षे दिसत होती पण पवारांनी त्यांना पाठिशी घातले आणि भाई वैद्य मात्र आज पवारांना आपले नेते करायला निघाले आहेत. छगन भुजबळ हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे हिमनगाचे दृष्य टोक आहे. अजून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामागचा ससेमिरा सुरू झालेला नाही. तो झाला म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस ही काय चीज आहे हे लक्षात येणार आहे. याच पक्षाचे एक आमदार रमेश कदम हेही कोणत्याही क्षणी खडी फोडायला जातील याचा नेम नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले आर्थिक महामंडळात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यापोटीच कदम यांच्या १२२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आलेली आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचा लाभ राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी घेतला आहे.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी तुरुंगात जाऊन आल्या. त्यानंतरच्या दोनच दिवसात विधानपरिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे हेही भुजबळांना भेटून आले. याचे निरनिराळे अर्थ सध्या लावले जात आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत या दोघांनी भुजबळांची घेतलेली भेट ही मानवतावादी होती हे दिसलेले नाही. अनेकांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या आहेत. पूर्वी अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांना उघडे पाडले होते. त्यातले दोघे नशिबाने सुटले. तर दोघे सध्या तुरुंगात आहेत. गुलाबराव देवकर हे एक मंत्री आणि दुसरे सुरेशदादा जैन. ही सगळी राष्ट्रवादीतली भ्रष्ट परंपरा भाई वैद्य यांना दिसत नाही असे कसे म्हणावे? घरी चालून आलेले लाचेचे पैसे नाकारणारे भाई वैद्य या भ्रष्ट परंपरेच्या नेत्याला केवळ स्वतःचेच नाही तर सगळ्या देशभरातल्या पुरोगाम्यांचे नेतृत्व करण्याचे आवाहन करत आहेत. अशा प्रकारच्या भ्रष्ट शिरोमणी माणसाला नेतृत्वाची गळ घालण्याऐवजी पुरोगामी चळवळीला स्वतःचा नेता का निर्माण करता आला नाही हा प्रश्‍न विचारला गेला पाहिजे आणि त्यासाठी या कथित पुरोगाम्यांना आपल्या दिशाहीन वाटचालीचे सिंहावलोकन करावे लागणार आहे.

पुरोगाम्यांनी आपले पुरोगामित्व सिध्द करण्यासाठी स्वतः कसल्याच पुरोगामी चळवळी केल्या नाहीत. मात्र आपल्या पुरोगामित्वाचा कुर्ता अधिक स्वच्छ दिसावा यासाठी कोणाला तरी प्रतिगामी ठरवून त्यालाच सातत्याने लक्ष्य केले आहे. त्यामुळे त्यांनी ज्याला कोणाला प्रतिगामी ठरवले त्याची टर उडवण्यासाठी हे पुरोगामी विचारवंत जे काही बोलत असत त्यामुळे लोकांची करमणूक होई आणि करमणूक होणारे लोक जी तात्पुरती वाहवा करत तिच्यातच हे पुरोगामी स्वतःला धन्य धन्य मानत. त्यांनी आजपर्यंत कधी भाजपाच्या विरोधात कॉंग्रेसला जवळ केले तर कधी कॉंग्रेसच्या विरोधात भाजपाला जवळ केले. एकुणात कॉंग्रेस पक्ष संपत गेला आणि भाजपाची सरशी झाली. मात्र आपण कॉंग्रेस आणि भाजपाला खेळवत आहोत अशा भ्रमात असलेले हे पुरोगामी मात्र स्वतःच नामशेष होत गेले. त्यांना ना राजकारणावर आपली छाप पाडता आली ना समाजकारणावर. पुरोगामी विचार वाईट नाही. परंतु सध्या सारे जग तंत्रज्ञानामुळे अशा एका विशिष्ट परिस्थितीत येऊन उभे राहिले आहे की त्या परिस्थितीत प्रतिगामी आणि पुरोगामी हे शब्दच अर्थहीन ठरले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या पुरोगामीपणाची व्याख्या बदलत्या काळानुसार बदलून घेण्याऐवजी ही पुरोगामी मंडळी जुन्याच विचारांना कवटाळत बसली आणि आता त्यांना नेता शोधावा लागत आहे.

Leave a Comment