संपूर्ण ऑक्सिजनचे वातावरण असलेल्या श्वेत ताऱ्याचा शोध

Dox
वॉशिंग्टन: रिओ ग्रँड विद्यापीठाच्या संशिधक द्वयाने त्यांच्या आणखी एका सहकाऱ्याच्या साथीने संपूर्ण ऑक्सिजनच्या वातावरणाने बनलेल्या श्वेत बटू ताऱ्याचा शोध लावला आहे. या ताऱ्याला ‘डॉक्स’ असे नाव देण्यात आले आहे.

‘जर्नल सायन्स’ मध्ये प्रसिद्ध केलेल्या शोध निबंधात या ताऱ्याच्या शोधाबाबत माहिती देण्यात आली आहे. केल्पर डिसूझा ऑलिव्हियेरा, डेटलेव्ह कोएस्टर आणि गुस्ताव युरीक यांनी या बटू ताऱ्याचा शोध लावला आहे. सामान्यपणे एखाद्या ताऱ्याच्या वातावरणातील आर्द्रता संपुष्टात आल्याने त्याच्या वातावरणातील वरचा थर नष्ट होतो. गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून त्याच्या आकारमानात घट होते. त्याच्या वातावरणातील हायड्रोजन आणि हेलियम वरच्या थरात येतात.

मात्र नव्याने शोधण्यात आलेल्या या ताऱ्याची जन्मकथा इतरांपेक्षा वेगळी आहे. वातावरणात तुलनेने हलके असणाऱ्या हायड्रोजन आणि हेलियम या वायूंचे प्रमाण या ग्रहाच्या वातावरणात नगण्य असून वातावरण प्रामुख्याने शुद्ध ऑक्सिजनपासून बनले आहे. आज पर्यंत निदर्शनास आलेल्या ताऱ्यांमध्ये अशा प्रकारे शुद्ध ऑक्सिजनच्या वातावरणाचे वेष्टन असलेला हा पहिलाच तारा असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

अशा प्रकारचा तारा अस्तित्वात असण्याची शक्यता यापूर्वीही व्यक्त करण्यात आली असली तरीही प्रत्यक्ष परिस्थितीत त्याच्या अस्तित्वाबाबत संशोधकांच्या वर्तुळात अविश्वासच होता. मात्र शुद्ध ऑक्सिजनचे वातावरण असलेला तारा दिसून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या ताऱ्याची उत्पत्ती नेमकी कशी झाली; याबाबत ठोस काही निष्कर्ष काढणे शक्य झाले नसले तरीही दोन जुळ्या ताऱ्यांपैकी डॉक्स हा एक तारा असावा आणि त्याचा साथीदार असलेला दुसरा तारा नष्ट झाला असावा; असा संशोधकांचा कयास आहे.

Leave a Comment