माध्यमाविषयीचे तारतम्य

education
इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्याशिवाय मुलगा हुशार होणार नाही असा गैरसमज झालेले मुलांचे अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून त्यांचे नुकसान करत आहेत. मात्र त्यातल्या काही पालकांना नंतर मुलाला इंग्रजी माध्यमात घातल्याचा पश्‍चात्ताप होतो. तशीच परिस्थिती काही शाळांची होऊ शकते. अशा शाळांकरिता गोव्याच्या सरकारने एक चांगला उपक्रम सुरू केला आहे. २-३ वर्षे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवून पुन्हा तिला मराठी माध्यमाची करणार्‍यांना शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ४०० रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय गोव्याच्या या सरकारने केला आहे. सध्या आपल्या देशात शिक्षणाच्या संबंधाने अनेक पैलूंवर विचार सुरू आहे. मुलांना कोणत्या माध्यमातून शिकवावे हासुध्दा गंभीर प्रश्‍न आहे आणि या संबंधात चुकीचे निर्णय घेतल्यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी लटकायला लागले आहे.

मुलांचे शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले पाहिजे या संबंधीची पालकांची चुकीची समजूत त्या मुलांच्या मुळावर आलेली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात माध्यमाच्या निवडीविषयीची साक्षरता निर्माण होण्याची गरज दिसायला लागली आहे. कारण आज लोकांचा असा समज झालेला आहे की मुलांचे भवितव्य चांगले घडवायचे असेल तर ते इंग्रजी माध्यमातून घडू शकते आणि या समजुतीपोटीच मुळात मराठी भाषक असलेल्या आणि घरात इंग्रजी बोलण्याची कसलीही परंपरा नसलेल्या कुटुंबातील लहान मुलांना जबरदस्तीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये कोंबले जायला लागले आहे. मात्र अशा पालकांना आपण मुलाला इंग्रजी माध्यमात घालून त्याचे नुकसान केले आहे. हे काही दिवसांनी लक्षात यायला लागते अशा मुलांचे पालक दुसरी, तिसरीनंतर आपल्या मुलांना पुन्हा मराठी माध्यमात घालायला लागले आहेत.

आपल्या सभोवती असलेल्या अनेक कर्तबगार लोकांमधून किती लोकांनी मातृभाषेतून शिक्षण घेतलेले आहे आणि किती लोकांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतले आहे याचा पडताळा यातला कोणताही पालक घेत नाही. इंग्रजी ही एकेकाळी आपल्या देशातल्या सत्ताधार्‍यांची भाषा होती आणि ती आता मुक्त अर्थव्यवस्थेची भाषा झाली आहे. त्यामुळे मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळवण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे आणि इंग्रजीतून शिकण्यात प्रतिष्ठा आहे या दोन गोष्टी या पालकांच्या मनावर बिंबलेल्या आहेत. पण इंग्रजी चांगले येणे आवश्यक आहे हे मान्यच आहे. तथापि इंग्रजी चांगले येण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले पाहिजे हे काही खरे नाही.

Leave a Comment