भारतातून ४ हजार कोट्याधीशांचे स्थलांतर

Indian-Rupees
नवी दिल्ली: देशातील तब्बल ४ हजार कोट्याधीशांनी सन २०१५ या वर्षात बाहेरच्या देशात स्थलांतरीत झाल्याची माहिती ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थलांतर करणारे सर्वाधिक कोट्याधीश फ्रान्समधील असून सर्वाधिक स्थलांतरितांनी ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होण्यास पसंती दिली आहे.

फ्रान्समधून १० हजार कोट्याधीशांनी स्थलांतर केले असून त्यापाठोपाठ चीनमधील ९ हजार कोट्यधीशांनी देश सोडला आहे. भारत आणि चीनमधील लोकांनी देश सोडून जाणे ही चिंतेची बाब नसल्याचे अहवालात म्हटले आहे. इटलीमधून ६ हजार कोट्याधीशांनी स्थलांतर केले आहे.

भारत आणि चीनमधील कोट्यधीश लोक देश सोडून जात असले तरी या देशांमध्ये अनेक नवे कोट्याधीश बनत असल्याने कोट्याधीशांचे स्थलांतर ही बाब या देशांसाठी फारशी गंभीर नाही. या देशात जीवनशैली सुधारल्यास देश सोडून गेलेले कोट्याधीश पुन्हा परततील; असा विश्वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

स्थलांतर करणाऱ्या कोट्याधीशांपैकी सर्वाधिक ८ हजार जण ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. त्यानंतर अमेरिकेत ७ हजार तर कॅनडामध्ये ५ हजार कोट्याधीश स्थायिक झाले आहेत.

Leave a Comment