यूकेमधील स्टील उद्योगाला ‘टाटा’ करणार बाय बाय ?

tata-steel
मुंबई – यूकेमधील आपला संपूर्ण स्टील उद्योग विकण्याचा विचार ब्रिटनमधील सर्वात मोठी स्टील उत्पादक भारतीय कंपनी टाटा स्टील करत असून टाटा स्टीलच्या संचालक मंडळाची यासंबंधी निर्णय घेण्यासाठी मुंबईत अनेक तास बैठक चालली.

स्टील उद्योगाची मागील काहीवर्षातील कमकुवत स्थिती आणि मागच्या काही महिन्यात यूकेमध्ये टाटा स्टीलला मोठया तोटयाला सामोरे जावे लागल्यामुळे टाटा स्टील यूकेमधील स्टील उद्योग विकण्याचा विचार करत आहे. वाढता निर्माण खर्च, देशांतर्गत घटलेली मागणी आणि युरोपमध्ये चीनच्या स्टीलची वाढलेली आयात यामुळे कंपनीचा तोटा वाढत चालल्याने टाटा स्टील उद्योगविक्रीच्या निर्णयाप्रत आले आहे.

युरोपमध्ये स्टील उद्योगाचा विस्तार करण्यासाठी २००७ मध्ये टाटा स्टीलने ब्रिटनमधील कोरस स्टील कंपनीचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर या कंपनीचे टाटा स्टील असे नामकरण झाले. पण स्टील उद्योगाची स्थिती खराब झाल्याने त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला. टाटा स्टीलने खर्च कपातीचे विविध उपाय योजण्याचाही फायदा झाला नाही. टाटा स्टीलची यूके सरकार आणि विक्री संदर्भात ग्रेबुल कॅपिटलबरोबर चर्चा सुरु आहे.

Leave a Comment