फक्त संशोधन तळ मंगळावर उभारण्याचे नासाचे उद्दिष्ट

nasa
वॉशिंग्टन : अमेरिकेची अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था नासाने मंगळावर स्वारीचे बेत तर आखलेच आहेत, पण तेथे वस्ती करण्याचा कुठलाही विचार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत. अवकाश पर्यटनाच्या उद्योगात आघाडीवर असलेल्या स्पेस एक्स व टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांना मात्र मंगळावर वस्ती करणे शक्य आहे व त्यांच्या हयातीत ती घडून येईल असे त्यांना वाटते.

माणसाला मंगळावर पाठवण्याचे उद्दिष्ट नासाचे आहे. यात शंका नाही, पण तेथे मानवी वस्ती करण्याचा त्यांचा कुठलाही इरादा नाही. तेथे संशोधन तळ उभारण्यात येईल असे नासाने म्हटले आहे. नासाने कधीही त्यांच्या अवकाशवीरांना संबंधित ग्रहावर किंवा उपग्रहावर ठेवलेले नाही. किंबहुना चंद्रावरही फक्त माणसाला उतरवण्यात आले तेथे वस्ती करण्याचा नासाचा कधीच उद्देश नव्हता तेच मंगळाच्या बाबतीतही सत्य आहे. अपोलो मोहीम किंवा स्पेस शटल मोहिमा यात अनेक धोके पत्करून नासाने शेवटी माणसाला परत पृथ्वीवर आणले आहे. नासाच्या मानवी अवकाश मोहिमांचे मुख्य वैज्ञानिक बेन ब्युसी यांनी अलीकडेच असे सांगितले, की मंगळावर वस्ती करण्याचा नासाचा कुठलाही इरादा नाही. मंगळावर वस्ती करण्याला खूप काळ द्यावा लागेल व तेथे कायमस्वरूपी तळ उभारण्याचा कुठलाही इरादा नाही.

नासा अवकाश पर्यटनाच्या क्षेत्रात उतरणार आहे. हे त्यांनी अलीकडेच जारी केलेल्या पोस्टर्स व ग्राफिक्सवरून स्पष्ट होत आहे, पण त्यातही ठोसपणा नाही. ब्युसी यांच्या मते, पहिल्या चमूसाठी संशोधन तळ उभारावा लागणार आहे यात शंका नाही, पण तो चमू परत आल्यानंतर दुसरा चमू जाईल ही पद्धत वापरली जाईल जशी ती अवकाशस्थानकात वापरली जात आहे, पण कायम माणसांना तेथेच ठेवले जाईल असे नाही. एलन मस्क यांनी म्हटले आहे, की मंगळावर वस्ती करणे शक्य आहे व त्यासाठी फेरवापराचे अग्निबाण तयार करावे लागतील. काही प्रमाणात त्यात यशही आले आहे. मंगळावर वस्तीच नव्हेतर स्वबळावर टिकणारी मानवी संस्कृती तयार करणे शक्य आहे, असे मस्क यांनी रॉयल एरॉनॉटिकल सोसायटीच्या लंडन येथील बैठकीत सांगितले होते.

पहिल्यांदा १०-१५ माणसे मंगळावर वस्ती करतील किंबहुना ही संख्या जास्तही असू शकेल असे सांगून ते म्हणतात, की खासगी अवकाश पर्यटनाच्या माध्यमातून ५ लाख डॉलर्सप्रमाणे पैसे गोळा करता येतील व सरकारही ४० अब्ज डॉलर्स देईल अशी त्यांना आशा आहे. मंगळावर वसाहतीसाठी काही पैसा वापरावा लागेल. त्यात मूलभूत सोयींचा समावेश असेल. मंगळावर वेळोवेळी येणेजाणे सुरू झाले तर त्यातून खर्च कमी होईल. मार्स वन या ना नफा ना तोटा तत्त्वावरील कंपनीने ११ वर्षांत मंगळावर वसाहती उभारण्याचे ठरवले आहे, यात त्यांचे म्हणणे तुम्ही परत पृथ्वीवर येऊ शकणार नाही. तुमचा शेवटही तेथेच होईल. ही कल्पना लोकांच्या गळी उतरवणे अवघड आहे. २०२७ मध्ये त्यांचा पहिला गट मंगळावर उतरणार आहे व त्यानंतर दोन वर्षांनी लोकांना ना परतीच्या बोलीवर मंगळावर नेऊन सोडले जाईल. मस्क यांच्या मते मंगळावर किमान दहा हजार लोकांची वस्ती करण्याचे उद्दिष्ट शक्य आहे.

Leave a Comment