‘बीपीओ’मध्ये फिलिपाईन्सने दिली भारताला मात

BPO
मुंबई: एकेकाळी ‘बीपीओ’ व्यवसायात जगात आघाडीवर असलेल्या भारताचे आघाडीचे स्थान पूर्व आशियातील फिलिपाईन्सने हिरावून घेतले आहे. जगभरातील महत्वाचे ग्राहक पटकावून सध्या फिलिपाईन्स हा ‘बीपीओ’मध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

विविध देशातील मोठ्या कंपन्यांच्या ग्राहकांशी त्यांच्या देशातील ढंगाच्या इंग्रजीत संवाद साधून त्यांना आपण हजारो मैल दूरच्या माणसाशी बोलतो आहोत याची जाणीव होऊ न देण्याचे कौशल्य या देशातील युवकांमध्ये निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याला आता फळ मिळताना दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बीपीओ सेवांवर भर देणाऱ्या जगभरातील बँका, विमा कंपन्या, टेलिकॉम कंपन्या अशा आघाडीच्या कंपन्या फिलिपाईन्समधील ‘बीपीओ’ कंपन्यांचे ग्राहक बनल्या आहेत.

‘बीपीओ’ कंपन्यांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी फिलिपिनो युवक, युवतींना इंग्रजी संभाषणाचे काटेकोर प्रशिक्षण दिले जाते. केवळ इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशातच इंग्रजी शंभराहून अधिक पद्धतीने बोलली जाते. न्यूयॉर्कमध्ये एका प्रकारची इंग्रजी बोलली जाते; तर दक्षिण अमेरिकेतील देशात इंग्रजी उच्चारणाची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे या युवकांना किमान ३० ते ४० प्रकारच्या इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण दिले जाते.

फिलिपाईन्समध्ये इंग्रजी शिकणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. तिथे शाळेत प्राथमिक स्तरापासून इंग्रजी शिकविली जाते. या देशातील सुमारे ७० टक्के नागरिकांना इंग्रजी कळते आणि बोलता येते. मात्र इंग्रजी वाचणे, लिहीणे आणि बोलणे यात फरक असल्याने ‘बीपीओ’मध्ये काम करू इच्छिणाऱ्या युवकांना इंग्रजी उच्चारणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात येते.

बीपीओ व्यवसाय सुरू झाल्यापासून भारताने त्यात आघाडी घेतली असली तरीही त्यांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी जाणीवपूर्वक आणि व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भारतीयांचे इंग्रजी उच्चारण इंग्लंड अथवा अमेरिकेतील ग्राहकांना समजून घेणे अवघड जात आहे. त्यामुळे भारतातील बहुतेक कॉल सेंटर्स बंद करण्याचा निर्णय ब्रिटीश टेलिकॉम कंपन्यांनी घेतला आहे.

मुळात ब्रिटीश कंपन्यांची ५० टक्क्यांहून अधिक कॉल सेंटर्स इंग्लंडमध्येच आहेत. एक वर्षभरात हा व्यवसाय ८० टक्क्यांपर्यंत इंग्लंडमध्येच आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. अमेरिकेतही कॉल सेंटर्स भारतात असण्याबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी आहे. त्यात फिलिपाईन्स सारख्या देशात भारतापेक्षा स्वस्त आणि अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने भारतातील ‘बीपीओ’ व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या व्यवसायात वाहणारे नवे वारे ओळखून त्यानुसार व्यवसायात बदल करण्याबाबत भारतीय व्यावसायिक काटेकोर नाहीत. मात्र फिलिपाईन्समध्ये याची कटाक्षाने दाखल घेतली जात आहे. ‘एसपीआय ग्लोबल’ या ‘बीपीओ’चे प्रशिक्षण देणाऱ्या फिलिपिनो कंपनीतील प्रशिक्षक मारिया कॉन्स्टेन्टिनो यांच्या म्हणण्यानुसार; केवळ विविध प्रदेशातील उच्चार करण्याची पद्धत शिकविणे पुरेसे नसते; तर उमेदवारांना बोलण्यातील सभ्यता, शिष्टाचार याचे प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे. त्यावर या देशात भर दिला जातो.

‘आयबीएम’च्या अंदाजानुसार पुढील चार वर्षात अमेरिकेत स्पॅनिश बोलणारे लोक इंग्रजी बोलणाऱ्या लोकांपेक्षा संख्येने अधिक असणार आहेत. त्यामुळे ‘बीपीओ’मध्ये काम करू इच्छिणाऱ्या युवकांना इंग्रजीबरोबर स्पॅनिश भाषा शिकणे आवश्यक आहे. याची दखल घेऊन फिलिपाईन्समध्ये त्याची सुरुवातही झाली आहे.

फिलिपाईन्समधील या उभरत्या करिअर संधीकडे या देशातील युवक आकर्षित होत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच या व्यवसायात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ‘बीपीओ’मध्ये काम करणाऱ्या युवकांमध्ये ८० टक्क्याहून अधिक जणांचा वयोगट २५ वर्षापेक्षा कमी आहे. त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांचे वय २२ पासून सुरू होते. सध्या फिलिपाईन्समध्ये ११ लाख जण ‘बीपीओ’मध्ये काम करीत आहेत. या उद्योगातून देशाला वार्षिक १९ अरब डॉलर उत्पन्न मिळत आहे. आगामी दोन वर्षात ही रक्कम २६ अरब डॉलर पर्यंत पोहोचेल; असा कयास आहे.

Leave a Comment