सासुरवास झेलणारी आता आहे करोडो डॉलर्सची मालकीण

kalpana-saroj
मुंबई : महाराष्ट्रातील अनेकांना एक अभिमानास्पद व्यक्तिमत्व असलेल्या कल्पना सरोज यांची कहाणी माहित नाही. यांचे नाव आज व्यवसाय क्षेत्रात सरोज मानाने घेतले जाते.

विदर्भातील एका दलित परिवारात जन्माला आलेल्या कल्पना सरोज यांना शिक्षणाची खूप आवड होती. पण शाळेत होत असलेल्या भेदभावाला मात्र त्या कंटाळल्या. अशा परिस्थितीतही त्यांनी हिंमत हरली नाही आणि शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. पण वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिल्यामुळे त्यांचे शिक्षणाचे स्वप्न अपूर्णच राहिले.

त्यांच्या आयुष्यात लग्नानंतरही तणाव वाढतच राहिला. सरोजचा सासरच्या लोकांनी छळ करण्यास सुरुवात केली. याची माहिती त्यांच्या वडिलांना समजताच वडिलांनी त्यांना माहेरी परत आणले. पण, शेजाऱ्यांनी आणि समाजाने मारलेल्या टोमण्यांना वैतागून सरोज यांनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने त्या वाचल्या.

त्यांनी या नवजीवनानंतर स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईला येऊन त्यांनी शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. दिवसाला १६ ते १८ तास काम करुन त्यांनी फर्निचरचा एक व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाने त्यांना व्यवसाय क्षेत्रातील बारीक गोष्टींचीही माहिती करुन दिली.
त्यांना कमानी ट्यूब्स या नुकसानीत असलेल्या कंपनीची माहिती २००१ साली मिळाली. त्यांनी या कंपनीला वाचवण्याचा प्रस्ताव दिला आणि कंपनीची सूत्र आपल्या हाती घेतली. कंपनीवर असलेल्या कर्जाची त्यांनी पुनर्रचना करुन घेतली. या कंपनीला त्यांनी केवळ वाचवलेच नाही, तर कंपनीला फायद्यातही आणले. कंपनीवरील सर्व कर्जही फेडले.

आता त्याच कंपनीच्या कल्पना सरोज या मालकीण आहेत आणि या कंपनीची किंमत ११२ दशलक्ष इतकी आहे. व्यापार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना २०१३ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. भारतीय महिला बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर हे मानाचे पदही त्यांना देण्यात आले.

Leave a Comment