शिवरायाचा आठवावा साक्षेप…

Shivaji
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान! ‘जाणता राजा’ म्हणून त्यांना महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जग ओळखते. त्यांच्याबद्दल किमान मराठी माणसाला फार काही सांगावे लागत नाही; असे मानले जाते. मात्र करंगळी कापून रक्ताभिषेक करून घेतलेली स्वराज्याची शपथ, अफझलखानाचा वध, सुरतेची लूट, राज्याभिषेक, आग्र्याहून सुटका अशा ठळक घटना वगळता या राजाचे वेगळेपण फारसे लक्षात घेतले जात नाही; हे महाराष्ट्राचे कर्मकरंटेपणच म्हणावे लागेल. त्यांचे वेगळेपण आणि पराक्रमासह व्यवस्थापकीय आणि प्रशासनाचे गुण हे आजही आपल्याला उपयुक्त आहेत. या महान योद्धा आणि प्रशासकाच्या जयंतीनिमित्त त्यांचा ‘साक्षेप’ आठवणे हे आपले कर्तव्यच आहे.

स्वराज्याची स्थापना: छत्रपती शिवाजी महाराज हे राजकुळात जन्माला आले नाहीत. त्यांचे पिता शहाजी राजे हे मोठे सरदार असले तरीही त्यांचे उभे आयुष्य अस्थिरतेत गेले. मात्र ऐषाराम आणि साधन सामुग्री शिवरायांना वारसा म्हणून मिळाले नसले तरी आपल्या समाजाविषयी संवेदनशीलता, महत्वाकांक्षा आणि पराक्रमाचा वारसा त्यांना शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्याकडून मिळाले. त्याच्या जोरावर त्यांनी सामान्य मराठी माणसामध्ये, मावळ्यांमध्ये स्वाभिमान, आत्मविश्वास जागविला आणि अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

स्वराज्य रक्षणासाठी किल्ल्यांची उभारणी: कोणत्याही राजा, बादशहाला प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आणि क्वचित प्रसंगी प्रजेच्या सुखासमाधानासाठी आलिशान सुविधा अथवा देखण्या वास्तू उभारणे योग्य वाटते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासमोरील आव्हाने ओळखून आपल्या छातीचा कोट करून स्वराज्याचे रक्षण करणारे १०० हून अधिक किल्ल्यांची उभारणी केली.

नियमाधिष्ठीत करप्रणालीचे विकसन: छत्रपतींच्या पूर्वी कर वसुलीसाठी कोणतीही नियमांवर आधारलेली कर पद्धती अस्तित्वात नव्हती. राज्यकर्ते आणि त्यांचे स्थानिक अंमलदार त्यांच्या मनाला येईल त्याच्याकडून मनाला येईल त्या प्रमाणात वसुली करीत असत. मात्र शिवरायांनी कर वसुलीसाठी नियम निर्माण केले. विशेषत: शेतकऱ्यांना परवडेल; अशी करप्रणाली विकसित करून रयतेला दिलासा दिला.

कृषीविकासाला प्राधान्य: शिवरायांनी प्रजेला पुरेसे अन्न धान्य उपलब्ध व्हावे आणि त्याचबरोबर भूमिहीन प्रजेला रोजगार मिळावा; यासाठी भूमिहीनांना शासकीय जमिनी कसण्यासाठी दिल्या. शेतीला आणि नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिजाऊ आणि शिवरायांनी अनेक धरणांची उभारणी केली.

आधुनिक इतिहासातील भारतीय नौदलाचे जनक: समुद्रबंदीच्या घातक प्रथेमुळे भारतातील लुप्त झालेली नौकानयनाचे पुनरुज्जीवन करून महाराजांनी आधुनिक इतिहासातील पहिल्या भारतीय नौदलाची उभारणी केली. विदेशी आक्रमणापासून भारतीय किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी हे नौदल प्रभावी ठरले.

कायद्याच्या राज्याची प्रस्थापना: महाराजांनी अन्य राज्यकर्त्यांप्रमाणे आपल्या मनाला वाटेल तसे, रूढी, परंपरा अथवा धर्माधिष्ठीत पद्धतीने न्यायदान न करता समाजाच्या धारणेसाठी आवश्यक असे अनेक कायदे केले. विशेषत: शेतकरी, बलुतेदार आणि महिला यांना संरक्षण देण्याकडे स्वराज्यात कटाक्ष असे.

धर्मनिरपेक्षतेचा अंगीकार: भारतात वर्णव्यवस्था प्रस्थापित असतानाही महाराजांनी अनेकांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर विविध जबाबदाऱ्या आणि पदे प्रदान करून जाती, धर्मनिरपेक्षतेचा मानदंड प्रस्थापित केला. त्यांच्या सैन्यात, नौदलात विविध जातींसह मुस्लीम आणि विदेशी सेनानी मोठ्या प्रमाणात जबाबदारीच्या पदांवर कार्यरत होते. त्यांच्या अंगरक्षकांमध्येही अनेक मुस्लीम लढावैय्यांचा समावेश होता. त्या काळातील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतल्यास यातील महाराजांचे द्रष्टेपण ध्यानात येते.
गनिमी युद्धतंत्राचा विकास: महाराजांकडे तुलनेने अत्यंत तोकडे मनुष्यबळ होते. मात्र शत्रूला बेसावध अवस्थेत गाठून त्याच्यावर अचानक हल्ला करून त्यांची अधिकाधिक हानी करण्याच्या गनिमी युद्धतंत्राचा महाराजांनी अत्यंत प्रभावी वापर केला आणि मोठमोठ्या बादशहांना जेरीस आणले. या युद्धतंत्रामुळे छत्रपतींना जगातील आघाडीच्या महान योद्ध्यांमध्ये स्थान दिले जाते.

Leave a Comment