भारताला डावलून नेपाळचा चीनसोबत इंधन करार

nepal
काठमांडू – नुकतीच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी बीजिंगला भेट दिली. त्यावेळी पंतप्रधान शर्मा यांनी भारतावरील परावलंबित्व दूर करण्यासाठी चीनसमवेत विविध करार केले आहेत. नेपाळ यापुढे भारताव्यतिरिक्त चीनकडूनही इंधन खरेदी करू शकणार आहे.

नेपाळला अनेक वर्षांपासून भारत हा इंधनपुरवठा करणारा पारंपारिक निर्यातदार देश समजला जातो. नेपाळच्या राज्यघटनेत अलिकडे काही बदल करण्यात आल्यामुळे मैदानी भागात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मधेशी नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यासाठी मधेशी नागरिक आंदोलन करत आहेत. त्यामुळे नेपाळचे भारताशी असलेले संबंध ताणले गेले आहेत.

नेपाळ या सर्व प्रकारामुळे भारतावर अवलंबून असल्याचे दिसून आले. परिणामी नेपाळने भारतावर अघोषित नाकेबंदीचा आरोपही केला होता. नेपाळच्या मते, भारताकडून होणाऱ्या अघोषित नाकेबंदीमुळे नेपाळला गॅस, औषधे आणि इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा भासत आहे. त्यामुळेच नेपाळ आणि चीनदरम्यान चार अब्ज डॉलरचे करार झाले आहेत. नेपाळमध्ये तेलसाठ्याची गोदामे बांधणे, तिबेट रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून नेपाळपर्यंत रेल्वेजाळे उभारणे असे विविध करारांचा त्यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment