पेशीतील एचआयव्ही विषाणू काढण्यात यश

hiv
वाशिंग्टन : वैज्ञानिकांना जनुकीय संपादनाच्या विशिष्ट तंत्रज्ञानाने मानवी पेशीतील डीएनएमधून एचआयव्ही हा एडसला कारणीभूत होणारा विषाणू नष्ट करण्यात यश मिळाले असून त्यामुळे एडसच्या रुग्णांना बरे करण्यासाठी नवीन उपचार पद्धती विकसित होऊ शकते.

अमेरिकेत टेम्पल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनचे लेविस काटझ यांनी सांगितले की, एचआयव्हीचे नियंत्रण करण्यासाठी अ‍ॅन्टिरेट्रोव्हायरल औषधे महत्त्वाची ठरतात; पण ज्या वेळी रुग्ण अ‍ॅन्टिरेट्रोव्हायरल औषधे थांबवितात तेव्हा एचआयव्हीचा विषाणू पुन्हा बळावतो व त्याची पुनरावृत्ती होऊ लागते. एचआयव्ही विषाणूच्या पुनरावृत्तीने प्रतिकारशक्ती प्रणालीला मोठा हादरा बसतो व एडसची तीव्रता वाढत जाते. सीडी ४ टी पेशींमध्ये जेव्हा एचआयव्ही विषाणू चिकटतो तेव्हा त्यावर उपचार करणे कठीण असते. आता काही प्रयोगांत एचआयव्ही विषाणूला हेतूत: पुन्हा क्रियान्वित करण्यात आले त्यामुळे प्रतिकारशक्ती प्रणाली जास्त सज्ज होईल, असे अपेक्षित असते. संशोधकांनी एचआयव्ही १ प्रोव्हायरल डीएनए या विषाणूला जनुक संपादन तंत्रज्ञान वापरून लक्ष्य केले.

याच एचआयव्ही १ डीएनए या टी पेशींच्या जिनोममध्ये असलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी आरएनएचा वापर करण्यात आला व नंतर न्यूकिएझ एन्झाइमचा वापर टी पेशींच्या डीएनएचा धागा कापण्यासाठी करण्यात आला. न्यूक्लिएझने एचआयव्ही १ डीएनए संपादित केल्यानंतर जिनोमची दोन सुटी टोके पुन्हा डीएनए दुरुस्ती यंत्राने जोडली जातात. संशोधकांच्या मते त्यांनी सीडी ४ टी पेशींवर लक्ष केंद्रीत करताना पेशीतील विषाणू नष्ट करण्याचे तंत्र शोधले आहे त्यामुळे एचआयव्ही विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा होत नाही. वैज्ञानिकांनी एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या शरीरातील टी पेशी घेऊन त्या बाहेर वाढविल्या व नंतर जनुक संपादन पद्धत वापरून विषाणूंच्या नकला होऊन त्यांची संख्या वाढते ती प्रक्रिया थांबविली व त्यामुळे रुग्णाच्या पेशीतील विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला. अ‍ॅल्टड्ढा डीप होल जिनोम सिक्वेन्सिंग तंत्राने संशोधकांनी एचआयव्ही नष्ट केलेल्या पेशींचा जिनोम तपासला व त्यातील उत्परिवर्तनांचे विश्लेषण केले.

पेशींच्या जनुकीय आविष्कारणावर या जनुक संपादनाचे विपरीत परिणाम झाले नाहीत. ज्या पेशीतून एचआयव्ही १ काढून टाकण्यात आला त्यांची वाढ नंतर सुरळीत झाली. सीडी ४ टी पेशींच्या डीएनएतून एचआयव्ही काढून टाकण्यात जनुक संपादनाचा वापर करण्यात आला. त्यासाठी विषाणूच्या जिनोममध्ये उत्परिवर्तने घडविण्यात आली व त्यामुळे त्यांची पुनर्उत्पत्ती थांबली असे सांगण्यात आले. यामुळे पेशींमध्ये पुन्हा एचआयव्हीचा प्रादुर्भाव होत नाही व वाईट परिणामही होत नाहीत, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही