स्वतंत्र मराठवाड्याची हाळी

shrihari-aney
महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी विदर्भाच्या पाठोपाठ स्वतंत्र मराठवाड्याचीही हाळी दिली आणि त्यामुळे महाराष्ट्रात वैचारिक रणकंदन माजले. त्यात अणे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. खरे म्हणजे त्यांना राजीनामा देण्यास कोणी सांगितले नाही. आपल्यामुळे सरकार अडचणीत येत आहे असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी तसा खुलासाही केलेला आहे. ते महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्र सरकारचे वकील आहेत. ते काही सरकारी नोकर नाहीत. त्यामुळे त्यांची राजकीय मते सरकारशी मिळतीजुळती असलीच पाहिजेत अशी त्यांच्यावर सक्ती नाही. परंतु मराठवाड्याच्या विषयावरून ती वेगळी असल्याचे दिसले. त्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. त्यातल्या त्यात शिवसेनेचा गोंधळ सरकारसाठी अधिक गैरसोयीचा होता. कारण शिवसेना हा सत्ताधारी पक्षच आहे. अशा अडचणींमुळे श्रीहरी अणे यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन टाकला. त्यांनी केवळ विदर्भाच्या स्वतंत्र राज्याचा पुरस्कार केला तेव्हा एवढा गोंधळ माजला नाही कारण सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच विदर्भाला अनुकूल आहे. परंतु मराठवाड्याने अडचण झाली.

वास्तविक पाहता श्रीहरी अणे यांनी काही राजकीय पुढारी करतात तशी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केलेली नव्हती. ती त्यांच्या तोंडून कधी बाहेर पडली हे नीट पाहिले पाहिजे. मराठवाड्यात जालना येथे झालेल्या एका परिसंवादात बोलताना त्यांनी मराठवाडासुध्दा स्वतंत्र असायला हरकत नाही असे म्हटले. मुळात परिसंवादाचा विषय वेगळा होता. मराठवाड्याच्या विकासाच्या अनुशेषावर चर्चा सुरू होती. तेव्हा विकासाच्या बाबतीत मराठवाड्यावर विदर्भापेक्षाही अधिक अन्याय होतो असे प्रतिपादन केले गेले आणि त्याचवेळी अणे यांनी मग मराठवाडाही वेगळा व्हायला काय हरकत आहे असे प्रतिपादन केले. त्यातून हे सारे वादंग निर्माण झाले. सध्या केवळ महाराष्ट्रातच काय पण सार्‍या देशातच वादंग निर्माण करण्याचे सत्र निर्माण झाले आहे. कोणी काहीतरी एखादे वाक्य उच्चारले की त्याचा मागचा पुढचा संदर्भ सोडून त्याच्या एका वाक्यावरच वाद निर्माण केले जायला लागले आहेत. श्रीहरी अणे हे स्वतंत्र मराठवाडा राज्याचे पुरस्कर्ते आहेत, त्यांनी तसे आंदोलन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे किंवा चार लोकांना एकत्र आणून सरकारला तसे निवेदन दिले आहे. तसेच वेगळा मराठवाडा का निर्माण करावा याबद्दल काही युक्तिवाद केले आहेत असे काही घडलेले नाही.

जाता जाता सहजपणे एक शक्यता व्यक्त केली आहे. त्या बरोबर वाद सुरू झाला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. नवलाची आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही पत्रकारांनी अणे यांच्या मराठवाड्याच्या मागणीच्या मागे कोण उभे आहे आणि त्यातून भारतीय जनता पार्टीला काय साध्य करायचे आहे वगैरे विश्‍लेषणाचे तारे तोडायला सुरूवात केली. सध्या पत्रकारितेत हाही एक प्रवाह घुसला आहे. श्रीहरी अणे यांना मराठवाड्याची मागणी करायला लावायची आणि नंतर हळूच आपण आंदोलन सुरू करायचे असा भाजपचा डाव आहे असेही काही पत्रकारांनी विश्‍लेषण केले. त्यांच्यातर विश्‍लेषण बुध्दीचे कौतुक करावे थोडे आहे. भारतीय जनता पार्टीला मराठवाड्याची मागणी करायचीच असती तर त्यासाठी त्यांनी श्रीहरी अणे यांना पुढे केले नसते. कारण ते काही भाजपाचे कार्यकर्ते नाहीत. त्यांना भाजपाने तसे बोलण्याची आज्ञा दिली अशी शक्यता दुरान्वयानेसुध्दा नाही. मात्र कोणीतरी एखादे विधान केले आणि ते गंमत म्हणून केले तरी त्यावर वादंग उठवण्याची निबुर्र्ध्द स्पर्धा सध्या माध्यमात सुरू आहे. श्रीहरी अणे यांच्या संदर्भात असे वादंग उठवणार्‍यांनी अणे हे मुळात मराठवाड्यातले नाहीत याकडेही दुर्लक्ष केले आहे.

मराठवाड्याचे वेगळे राज्य असावे अशी मागणी विदर्भाएवढी जोरदारपणे कोणीही आणि कधीही केलेली नाही. तसा काही विचार कोणाच्या डोक्यातसुध्दा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तसे म्हटल्याचे प्रसिध्द होत आहे पण त्यामागचा संदर्भसुध्दा वेगळा होता. डॉ. आंबेडकरांनी तसे म्हटले म्हणून मराठवाड्याचे वेगळे राज्य करावे असा त्यांच्या या प्रतिपादनाचा वापर केला जावा अशी काही स्थिती नाही. परंतु वादंगासाठी वादंग निर्माण करणार्‍यांनी वेगळ्या मराठवाड्याचे हे पिल्लू सोडून दिले आणि चार दिवस लोकांची करमणूक झाली. मराठवाड्यातल्या लोकांनासुध्दा कधी वेगळ्या मराठवाड्याची मागणी करावीशी वाटलेली नाही. कोणातरी तिय्यम किंवा चौथ्या दर्जाच्या राजकीय कार्यकर्त्याने किंवा ग्रामपंचायत सदस्याच्या पातळीवरच्या पुढार्‍याने तसे उद्गार काढलेही असतील परंतु मुळात हा विषय कधीच पुढे आलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी या सार्‍या वादंगानंतर प्रसिध्द केलेल्या निवेदनामध्ये मराठवाडा आणि खानदेश यांचे एक राज्य असावे असे म्हटले आहे परंतु या पूर्वी संघाने असे कधी म्हटलेले नव्हते. संघाने सातत्याने विदर्भाचीच मागणी लावून धरली आहे. तेव्हा स्वतंत्र विदर्भाचा वाद हा काही लोकांच्या रिकामपणाचा उद्योग ठरलेला आहे.

Leave a Comment