झिकाची लस शोधत आहेत भारतासह पाच देश

Zika
संयुक्त राष्ट्र: मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय समस्या बनलेल्या झिका या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून भारतासह अमेरिका, फ्रान्स, ब्राझील आणि ऑस्ट्रीया या देशात प्रतिबंधक लास शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत; अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालिका मार्गारेट चान यांनी दिली आहे.

वर्षाभरापूर्वीपर्यंत झिकाबद्दल जगाला फारशी माहिती नव्हती. मात्र नवजात अर्भकांच्या मेंदूला इजा पोहोचवून त्यांच्यात विकृती निर्माण करणारा झिका हा विकार जागतिक समस्या बनला आहे. सध्या जगातील ३६ देशात या रोगाने पाळेमुळे पसरली आहेत; असे चान यांनी सांगितले.

या विकाराच्या निदानासाठी ३० हून अधिक कंपन्या चाचणी विकसित करीत आहेत; तर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी या पाच देशातील १४ लस निर्मात्यांचे २३ प्रकल्प कार्यान्वित आहेत; अशी माहिती त्यांनी दिली.

झिकाचे निदान करण्यासाठी विश्वासार्ह चाचणी विकसित करणे ही प्राधान्याची गरज आहे. मात्र प्रतिबंधक लस विकसित करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण करणे आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या वापरत आणणे याला काही वर्षाचा कालावधी लागू शकतो; असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.