नवी दिल्ली : ३४३ औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. काही औषध उत्पादक कंपन्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत निर्णयाला स्थगिती दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
उच्च न्यायालयाची ३४३ औषधांवरील बंदीला तात्पुरती स्थगिती
केंद्र सरकारने याप्रकरणी उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांना विश्वासात न घेता औषधबंदीचा निर्णय घेतला असे म्हणत ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या औषध विक्रेत्यांच्या संघटनेने याविरोधात संघर्षाचा पावित्रा घेतला आहे. गेल्या २५ वर्षांपासून वापरात असलेली औषधे मानवी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे ठरवल्याने सुमारे ७ हजार कोटींची औषधे नष्ट करावी लागणार आहेत. याचा फटका ८ लाखपेक्षा अधिक औषध विक्रेत्यांना बसणार आहे.