यंदा ऑनलाईन शॉपिंगमध्ये ७८ टक्के वाढ

ecom
असोचेम आणि प्राईस वॉटर हाऊस कूपर्स यांनी संयुक्तपणे कलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात यंदाच्या वर्षात ऑनलाईन शॉपिंगमध्ये ७८ टक्के वाढ होईल असे संकेत मिळाले आहेत. ऑनलाईन कंपन्या देत असलेल्या आकर्षक ऑफर्स आणि आक्रमक मार्केटिंग व त्याचबरोबर पुस्तकांपासून कपड्यांपर्यंत आणि दागिन्यांपासून इलेक्टॉनिक गॅजेटपर्यंत असा सर्व माल ऑनलाईन शॉपिंगवर मिळत असल्याने मंदी असूनही या व्यवसायात भक्कम वाढ होत असल्याचे निरीक्षणही नोंदविले गले आहे.

गतवर्षी म्हणजे २०१५ मध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये ६६ टक्के वाढ झाली होती ती यंदाच्या वर्षात ७८ टक्कयावर जाईल असे हा अहवाल सांगतो. अॅसोचेमचे महासचिव डी.एस रावत या संदर्भात माहिती देताना म्हणाले, २०१५ साली ५.५० कोटी ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केली होती तो आकडा यंदा ८ कोटींवर जाईल. स्मार्टफोन टॅब्लेटच्या लोकप्रियतेतील वाढही ऑनलाईन व्यवसायांना पूरक ठरते आहे. इंटरनेट असलेल्या सर्व उपकरणांमुळे ऑनलाईन शॉपिंग सोपे बनले आहे. त्यामुळे या व्यवसायाचा विस्तार वेगाने होत आहे आणि भारतीयांना शॉपिंगची ही पद्धत भावली आहे. या शॉपिंगमधील ११ टक्के शॉपिंग हे मोबाईलच्या सहाय्याने होते आहे हे प्रमाण २०१७ पर्यंत २५ टक्कयांवर जाईल.

सध्या ई कॉमर्सची उलाढाल २५ अब्ज डॉलर्सवर आहे ती येत्या पाच वर्षात १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल असेही रावत यांनी सांगितले.

Leave a Comment