राजा नायक ‘फ्रॉम रॅग टु रीच’

raja-nayak
पाच हजारात व्यवसायाची सुरूवात आता करोडोचे मालक
राजा नायक हे बंगळूरच्या उद्योग विश्वातले एक मातबर नाव आहे कारण ते 70 ते 80 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. एक काळ असा होता की ते आपल्या एवढ्या मोठ्या संपत्तीची कल्पनाही करू शकत नव्हते. आज त्यांच्या 10 बाय 10 च्या मोठ्या केबिनमध्ये बसून पत्रकार त्यांच्याशी वार्तालाप करतात पण लहान असताना त्यांची सात माणसांची फॅमिली याच आकाराच्या घरात रहात होती. चार भाऊ आणि एक बहीण अशा या मुलांना शिकवण्याचीही ताकद त्यांच्या पालकांत नव्हती. आपल्या गरिबीमुळे आपण आता फार काही शिकू शकत नाही याची जाणीव झालेल्या राजा नायक यांनी अकरावीत असताना शाळा सोडून दिली.

आपल्या गरिबीची विलक्षण चीड असलेल्या राजा यांनी भरपूर पैसा कमावण्याचे ठरवले. त्यांनी त्या वयात अमिताभ बच्चन याचा त्रिशूल हा सिनेमा पाहिला. ज्यात बच्चनने गरिबीतून वर येऊन बिल्डर बनून दाखवलेले असते. त्यातून प्रेरणा घेऊन राजा नायक यांनी घर सोडले आणि नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. काही दिवसांतच त्यांना अशा पळण्याने आणि कसलीही योजना न आखता मुंबईत आल्याने काही साध्य होत नाही याची जाणीव झाली. ते बंगळूरला परतले. धंदा तर सुरू करायचाच होता पण भांडवल नव्हते. त्यांच्या आईने गरिबीतूनही साठवलेलें पाच हजार रुपये त्यांना दिले. ते घेऊन राजा यांनी त्रिपूर हे गाव गाठले. जिथून करोडो रुपयांचे तयार कपडे परदेशी पाठवलें जातात. तिथला काही नाकारलेला माल म्हणजे शर्ट त्यांनी 50 रुपयाला एक या दराने खरेदी केले आणि बंगळूरमध्ये बॉश कंपनीच्या दारात उभे राहून 100 रुपयांना विकले. त्यात निळे शर्ट होते आणि तो त्या कंपनीच्या कामगारांचा गणवेष होता. दिवसातच 100 शर्ट विकले गेले आणि बघता बघता पाच हजाराचा नफा झाला. एवढी रक्कम त्यांनी कधी पाहिलीही नव्हती पण येथे तर त्यांना ती एका दिवसांतच मिळाली होती.

अशी सुरूवात करणार्‍या राजा नायक यांनी काही दिवस नाना प्रकारच्या वस्तू स्वस्तात आणून त्या फुटपाथवर विकण्याचा धंदा केला. पण नंतर तिथेच गुंतून न राहता नवे नवे धंदे सुरू केले. सुरूवात पॅकिंगच्या बॉक्सेसनी केली. नंतर पाण्याचा व्यवसाय केला. बांधकाम व्यवसाय केला. आपल्यावर लहानपणी शिक्षण सोडण्याची पाळी आली होती त्यामुळे शाळा सुरू केली. आता ते 70 ते 80 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. आपल्याला 100 कोटी कमाई असणार्‍या वर्गात जमा होण्याची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment