इटलीने खोलला भारतीय काळ्या पैशाचा पोल

black-money
नवी दिल्ली- ‘टॅक्स हॅवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी भारतीयांचे १५२ ते १८१ लाख डॉलर; म्हणजेच ९ ते ११ लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा असल्याचे बॅंक ऑफ इटलीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

शेअर्स, कर्ज अथवा ठेवींच्या स्वरूपात त्या ठिकाणी गुंतविण्यात आल्याचे हा अहवाल म्हणतो. मात्र मालमत्ता आणि सोन्याच्या स्वरूपात केलेल्या गुंतवणुकीबाबत या अहवालात काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. पेलेग्रिनी, सेनेली व तोस्ती या तिघा अर्थतज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल ‘आयएमफ’ आणि बॅंक ऑफ इंटरनॅशनल सॅटलमेंट्सच्या आकडेवारीवर आधारित आहे.

यापूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राने भारतीयांच्या काळ्या पैशांच्या गुंतवणुकीची माहिती बॅंक ऑफ इटलीकडे मागितली होती. मात्र त्यावेळी बॅंकेने माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

भारतातील काळा पैसा देशात राहिला असता तर सन १९७० पासूनच भारताच्या अर्थव्यवस्थेत ५ टक्के गतीने वाढ झाली असती; असा दावा डिसेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात करण्यात आला होता.

सध्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनेसह अन्य योजनांचा लाभ घेऊन नागरिक काळा पैसा चलनात आणतील. त्यातून सुमारे १५ हजार कोटी रुपये परत येतील; असा सरकारला विश्वास आहे. मात्र आज पर्यंत काळा पैसा चलनात आणण्याच्या अनेक शासकीय योजनांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही; ही वस्तुस्थिती आहे. सप्टेंबर २०१५ पर्यंत केवळ ६३८ जणांनी ३ हजार ७७० कोटी एवढा काळा पैसा जाहीर केला होता.

Leave a Comment