टेलिग्राम मेसेंजरवर बनवा ५ हजार सदस्यांचा सुपरग्रुप!

telegram
मुंबई : सध्याच्या लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअप या इन्स्टंट मेसेजिंग अॅपप्रमाणेच एक असलेल्या टेलिग्राम या मेसेंजर अॅपनेही आता कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खर तर टेलिग्राम हे फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकनेच बनवलेल्या मेसेंजरपेक्षाही अनेक बाबतीत सरस आहे. मात्र त्यांच्याकडे व्हॉट्सअप एवढा यूजर बेस नाही.

अलीकडेच मोठा गाजावाजा करत व्हॉट्सअपने ग्रुपमधील सदस्य संख्या २५६ पर्यंत वाढवली. यापूर्वी ५० आणि नंतर फक्त १०० सदस्य संख्येची मर्यादा होती. मात्र टेलिग्रामने अलीकडेच जारी केलेल्या अपडेटनुसार टेलिग्रामच्या सुपरग्रुपमध्ये तुम्हाला तब्बल ५००० सदस्य जोडता येतात. यापूर्वी टेलिग्रामच्या सुपरग्रुपला १००० सदस्यांची मर्यादा होती, ती आता ५००० पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच एखाद्या सुपरग्रुपमधील कोणत्या सदस्यांचा मेसेज सर्वात नवा किंवा महत्वाचा असेल तो तुम्हाला टाईमलाईनवर पिन करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे अॅडमिनला जास्त अधिकार टेलिग्रामने दिले आहेत. एखादा आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट अॅडमिनने डीलिट केला तर सर्व सदस्यांच्या टाईमलाईनवरूनही तो मेसेज किंवा ती पोस्ट डीलिट होईल. टेलिग्राम इन्स्टंट मेसेजिंग अॅपचं हे अपडेटेड व्हर्जन सध्या फक्त युरोप आणि अमेरिकेपुरतंच मर्यादित आहे. लवकरच टेलिग्रामचं हे व्हर्जन जगभरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment