२००३ पर्यंत या रेल्वेमार्गाची मालकी ब्रिटीशांकडे !

combo
आपला रेल्वे अर्थसंकल्‍प जरी सादर झाला असला तरी. विविध नव्‍या रेल्वेमार्गांची मागणी देशभरातून दरवर्षी रेल्वेमंत्र्यांकडे केली जाते. यावर्षीही अशा मागण्या झाल्या होत्या. मात्र, महाराष्‍ट्रातील एक रेल्वेमार्ग असा आहे, ज्‍याची मालकी स्‍वातंत्र्यानंतरही ब्रिटि‍शांकडे होती. भारतीय रेल्वेकडे हस्‍तांतरण झाल्‍यानंतरही या मार्गाचे नशीब पालटले नाही. हा मार्ग म्‍हणजे, यवतमाळ-मुर्तिजापूर मार्ग.

या नॅरो गेज रेल्वेमार्गाची उभारणी क्लिक निक्‍सन अँड कंपनीने केली. या कंपनीचे नाव काही वर्षांनी सेंट्रल प्रॉव्‍हीन्‍सेस रेल्वे कंपनी असे झाले. रेल्वेमार्गाची मालकी २००३ पर्यंत याच कंपनीकडे होती. या मार्गावर आजही एक गाडी धावते. शकुंतला एक्‍स्प्रेस तिचे नाव. शंभर वर्षांपेक्षा जास्‍त कालावधीपासून शकुंतला सेवा देत आहे. मात्र, आता ती थकली आहे. सध्‍या तर गाडी मुर्तिजापूर यार्डातच बंद पडलेली आहे. शकुंतलेचे रुप पालटण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षांपासून हा मार्ग ब्रॉडगेज करण्याची मागणी होत आहे. ब्रिटिशांनी भारतातील नैसर्गिक संपत्तीची अमाप लूट केली. विदर्भातील यवतमाळ जिल्‍हा हा पांढरे सोने अर्थात कापूस पिकविणारा मोठा जिल्‍हा होता. कापूस इंग्‍लंडला नेण्यासाठी ब्रिटिशांनी २० व्‍या शतकाच्‍या सुरुवातीला हा रेल्वेमार्ग सुरु केला. रेल्वेमार्ग पुढील १०० वर्षांसाठी कंपनीच्‍याच मालकीचा राहील, असा करारही ब्रिटिशांसोबत कंपनीने केला होता. त्यामुळे शकुंतलेची मालकी २००३ पर्यंत कंपनीकडेच होती. भारतीय रेल्वे अजुनही या कंपनीला रॉयल्‍टीची रक्‍कम देते. शकुंतलेबाबत अनेक गमतीदार गोष्‍टी सांगितल्‍या जातात. गाडी एवढी हळू धावते, की कोणीही धावत्या गाडीत चढतो आणि उतरतो. कोणी हात दाखवला तरी गाडी थांबते. रेल्वे फाटक आले, की चालकच गाडी थांबवून ते बंद करतो आणि गाडी पुढे गेल्‍यावर पुन्‍हा गाडी थांबवून फाटक उघडतो. कोणीही तिकीट काढत नाही. गाडी चालविण्याचा सर्व खर्च रेल्वेकडेच आहे. उत्‍पन्‍न काहीच नसल्‍यामुळे रेल्वेचे नुकसान होते. शकुंतला सध्‍या थांबली आहे. रेल्वेचे रुळ आणि स्‍लीपर्स अतिशय खराब झाले आहेत. त्याची दुरुस्‍तीही शक्‍य नाही. परंतु, ब्रॉडगेजमध्‍ये परिवर्तन केल्‍यास या रेल्वेमार्गाचा विदर्भातील कापूस उत्‍पादक क्षेत्राचा मोठा फायदा होऊ शकतो.

Leave a Comment