माल्ल्याला ईडीकडून दुसरे समन्स

vijay-mallya
मुंबई – ईडीने दुसरे समन्स जारी करत २ एप्रिल रोजी चौकशीसाठी संस्थेसमोर उपस्थित राहण्यास सांगितले. आयडीबीआय बँकेकडून ९०० कोटी रुपयांचे घेतलेल्या कर्जाच्या मनी लॉन्डरींगप्रकरणी जबाब नोंदविण्यास सांगितले आहे. ईडीने यापूर्वी १८ मार्च रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र याला प्रत्युत्तर देताना आपण उपस्थित राहू शकत नसून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हजर राहू शकत असल्याचे ई-मेलद्वारे ईडीला कळविले होते.

मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील विभागीय कार्यालयाला ईडीचे संचालक कर्नाल सिंग यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी माल्ल्या यांच्या प्रकरणावर पुढील कोणती रणनिती आखता येईल, यावर सविस्तर चर्चा केली. यापूर्वी ईडीने माल्ल्या यांच्या अधिकृत ई-मेलवर समन्स पाठविले होते आणि याचबरोबर किंगफिशर एअरलाईन्सच्या मुंबईतील कार्यालयामध्येही समन्स पाठविण्यात आले होते.

दरम्यान, किंगफिशर एअरलाईन्सचे माजी प्रमुख आर्थिक अधिकारी ए. रघुनाथन आणि युबी गुपचे प्रमुख आर्थिक अधिकारी रवी नेदुंगडी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान ईडीला महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे सांगण्यात आले. या कागदपत्रांवरून दोन्ही अधिकाऱयांची बँक व्यवहाराबद्दलची चौकशी करण्यात आली.

Leave a Comment