भारतीयांना फेसबुकने बग शोधण्यासाठी दिले ४.८४ कोटी

facebook
नवी दिल्ली – भारतीय संशोधकांना बग बाऊंटी कार्यक्रमाअंतर्गत सोशल नेटवर्किंग साइट फेसबुककडून ४.८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही बक्षीस स्वरुपातील आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. फेसबुकने त्यांच्या साइटवरील कोणत्याही प्रकारचे बग शोधण्यासाठी १५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्याला भारतीय तरुणांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला होता. भारतामध्ये फेसबुकचे १४.२ कोटी युजर्स आहेत.

फेसबुकशी संबंधित सर्वात जास्त संशोधक भारतामध्ये आहेत. जगातील १२७ देशांमध्ये फेसबुक आपली सेवा देते. भारतातून २०५ संशोधक २०११ पासून फेसबुकशी जोडले गेले आहेत, अशी माहिती फेबबुकच्या बग बाऊंटी कार्यक्रमाचे टेक्निकल अध्यक्ष एडम रुडरमान यांनी म्हटले आहे.

जगातील अनेक कंपन्या, गुगल, ट्विटर आणि फेसबुकने त्यांच्या त्यांच्या साइटवर बग शोधण्यासाठी रिवार्ड कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत, साइटच्या सॉफ्टवेअरमध्ये कोणत्याही प्रकारच्या कोंडिंगमध्ये झालेल्या समस्या शोधण्यासाठी हे बक्षीस देण्यात येते.