फाईव्ह स्टार हॉटेल सारखेच कारागृह

austria
ऑस्ट्रिया – आजच्या घडीला कोणालाही तुरुंगात जायला आवडेल का? या प्रश्नाचे उत्तर साहजिकच नाही असे असेल. तुरुंग म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर अंधार कोठडी, दुर्गंधी, खराब जेवण अशा अनेक गोष्टींचे चित्र येते. पण, जर का तुम्हाला कोणी एखादे तुरुंग पंचतारांकित हॉटेलसारखे असे सांगितले तर?

पण, आम्ही सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही हे आम्हाला देखील पटते आहे. पण युरोपातील ऑस्ट्रिया देशात एक असे कारागृह आहे ज्याची तुलना केवळ एखाद्या पंचतारांकित हॉटेलशी केली जाऊ शकते. तशाच सुविधा येथे ठेवल्या गेलेल्या कैद्यांना मिळतात. ’जस्टिस सेंटर लियोबेन’ नावाचे हे कारागृह गेल्या ११ वर्षांपासून येथे दिल्या जाणा-या सोयींसाठी प्रसिद्ध आहे.
austria1
ऑस्ट्रियातील लियोबेन शहरात हे कारागृह आहे. हे शहर पहाडी शहर असून त्याचं सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालते. जोसेफ होहेंसिन्न नावाच्या एका सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन वास्तुविशारदाने या कारागृहाची निर्मिती केली आहे. या कारागृहात २०० पेक्षा जास्त कैद्यांच्या राहाण्याची सोय केली जाऊ शकते. इतकेच काय तर या कारागृहात अत्याधुनिक जिम, स्पा आणि अनेक प्रकारची खेळ खेळण्याची व्यवस्थाही केली गेली आहे.

एकाच वेळेस एका ठिकाणी १३ कैद्यांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाते. आपापली खोली ते एकमेकांसोबत शेअर करण्याचीही त्यांना मुभा दिली जाते. येथील प्रत्येक कैद्याच्या खोलीत एक बाथरुम, एक स्वयंपाक घर आणि एका बेडरुमसोबतच एक लिव्हिंग रुम आहे. तसेच या लिव्हिंग रुममध्ये प्रत्येकी एक टेलिव्हिजनही आहे. आता इतके आलिशान कारागृह आहे म्हटल्यावर कोणाला या कारागृहात काही दिवस घालवावे असे वाटले नाही तर नवलच.

Leave a Comment