केंद्र सरकारचा सामान्य जनतेला पुन्हा धक्का

petrol
नवी दिल्ली : अगोदरच दुष्काळ आणि महागाईचा सामना सुरू असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून केंद्र सरकारने सामान्य जनतेला पुन्हा धक्का दिला आहे. पेट्रोलच्या दरात ३ रुपये ७ पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर १ रुपया ९० पैशांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे. अचानकच पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आल्याने पुन्हा महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

जानेवारी महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीचा धडाका सुरू होता. त्यामुळे काही अंशी का होईना महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली होती. मात्र, आज झालेल्या पाक्षिक बैठकीत अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलच्या किमती जानेवारीपासून कमी केल्या जात होत्या. मात्र, डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात येत होती. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रथमच, तर डिझेलच्या दरात सलग तिस-यांदा वाढ झाली आहे. मुळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी स्तरावरच आहेत. मात्र, केंद्र सरकारने नोव्हेंबरपासून तब्बल पाचवेळा उत्पादन शुल्कात वाढ करून आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या नीचांकी किमतीचा लाभ सामान्यांना मिळवून न देता सरकारी तिजोरी भरण्याचे काम केले. त्यामुळे आता उत्पादन शुल्क कमी करणे आवश्यक होते. मात्र, किमती वाढवून पुन्हा जनतेवरच दरवाढीचा बोजा टाकला आहे.

यासंदर्भात माहिती देताना आघाडीची ऑईल कंपनी इंडियन ऑईल कार्पोरेशन लि. ने आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन लक्षात घेता पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढविणे गरजेचे होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, मध्यरात्रीपासूनच दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ५६.६१ रुपयांऐवजी प्रतिलिटर ५९.६८ रुपये मोजावे लागणार आहेत, तर डिझेलसाठी ४६.४३ रुपयांऐवजी ४८.३३ रुपये मोजावे लागणार आहेत.

खरे तर पेट्रोलचे दर आतापर्यंत सलग सातवेळा कमी करण्यात आले होते. मात्र, आता त्यात भली मोठी वाढ करून जबरदस्त धक्का दिला. या अगोदर १ मार्च रोजी डिझेलच्या किमतीत १.४७ रुपयाने वाढ केली होती, तर पेट्रोल ३.०२ रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांत पेट्रोलच्या किमतीत पुन्हा ३ रुपये ७ पैशांनी वाढ केली, तर डिझेल १ रुपया ९० पैशांनी वाढविले. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य जनता पुन्हा महागाईत होरपळून निघणार आहे.

Leave a Comment