हा पठ्ठ्या बांधतोय चिऊताईसाठी घरटी

chimani
काऊचिऊच्या गोष्टी लहानपणापासून प्रत्येकजण ऐकत असतो. चिऊ म्हणजे चिमणी तशी हुषार समजली जाते. गोष्टीतही तिचे घर टिकाऊ मेणाचे असते. मात्र आजकाल वाढत्या नागरीकरणामुळे आणि सिमेंटच्या जंगलामुळे चिऊताईला घर बांधायला जागाच उरलेली नाही. परिणामी चिमण्या शहरातून नाहिशा होऊ लागल्या आहेत. चिऊताईवर विस्थापित होण्याची पाळी आल्याची जाणीव झालेल्या थॉमस डँबो या लंडनमधील तरूणाने त्याच्या मित्रांसह चिऊताईंची घरटी बनविण्याचा ध्यास घेतला आहे. गेल्या सात वर्षात त्याने वाया जाणार्‍या लाकडांच्या तुकड्यांपासून अशी ३५०० घरटी तयार केली आहेत.

थॉमस जगभरातील अनेक देशांत फिरून ही घरटी झाडांवर, इमारतींवर बसवित आहे. या घरट्यांना तो नावेही देतो. तो म्हणतो, चिमणी शतकानुशतके माणसांच्या वस्तीत राहात आहे. मात्र आता सिमेंट इमारतींत त्यांना घरटी बांधण्यात अडचणी येत असल्याने त्या आपल्याला सोडून दूर जाऊ लागल्या आहेत. त्यांनी मानवी वस्तीतच राहावे असे वाटत असेल तर त्यांच्या घरट्यांचा प्रश्न सोडविला पाहिजे व तो मी माझ्यापरीने सोडवू पाहतो आहे. चिमण्याच्या चिवचिवाटाशिवाय शहरे सुनी होऊ नयेत म्हणून हा प्रयत्न आहे.