भूतानच्या राजपुत्राचे लाखो झाडे लावून स्वागत - Majha Paper

भूतानच्या राजपुत्राचे लाखो झाडे लावून स्वागत

bhutan
भूतान – प्रत्येकासाठी बाळाचा जन्म हा आनंदाची बाब असते. तसाच आनंद भूतानमध्ये साजरा केला जात आहे. मात्र तो साजरा होतो आहे निसर्गात, निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करून. भूतानच्या राजघराण्यात राजपुत्राचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले जात आहे. हा आनंदोत्सव निसर्गासोबत तब्बल १ लाख ८ हजार वृक्षांची लागवड करून साजरा केला जात आहे.

झाडांची संख्या कमी होत चालली आहे. हा प्रश्न जसा भारताला सतावत आहे. तसाच तो इतर देशांना देखील त्रास देत आहे. वनसंपत्ती कमी झाल्यास त्याच्या दुरगामी परिणाम हा आपल्या मुलांना भोगावा लागेल या विचाराने राजपुत्राच्या स्वागतासाठी झाडे लावण्यात येत आहेत.

५ फेब्रुवारी रोजी राजा खेसर आणि राणी जेत्सुन यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर महिन्याभराने म्हणजे ६ मार्चला एक लाख स्वयंसेवकांनी देशभरात वृक्षारोपण केले. विशेष म्हणजे यात भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे, मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचाही समावेश होता. याबाबत टूरिझम भूतान या ट्विटर पेजवरून याची माहिती दिली आहे. राजपुत्राच्या स्वागतासाठी ५ हजार झाडे लावल्याची माहिती त्यांनी दिली. आणि हा अभिमानाचा क्षण आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली.

बौद्ध धर्मानुसार झाड हा पालनकर्ता, दाता यांचे प्रतीक असतो. दीर्घायुष्य, आरोग्य, सौंदर्य आणि ममता अशा अनेक भावभावना वृक्षाशी निगडीत आहेत. बोधिवृक्षाची संकल्पना त्यातून आल्याचे या मोहिमेचे प्रमुख तेंझिन लेकफेल यांनी सांगितले. १०८ या आकड्याला बौद्ध धर्मात पवित्र मानले जाते. म्हणूनच १०८ हजार म्हणजेच १ लाख ८ हजार झाडांची लागवड करुन नव्या जीवाचे स्वागत केल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment