तब्बल ५०० वर्षांनी लागला वास्को द गामाच्या जहाजाचा शोध

vasco-da-gama
दुबई : युरोपातून भारतात समुद्री मार्गाने १६ व्या शतकात प्रवास करणारा पहिला युरोपियन वास्को द गामाचे बुडालेले जहाज अखेर सापडले असून ओमानजवळ समुद्रात ५०० वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे अवशेष हाती लागले आहेत.

विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच चांदीची काही दुर्मिळ नाणीही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली आहेत. वास्को द गामाच्या काकांनी ही पोर्तुगीज जहाज समुद्रात नेले होते, मात्र हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे जहाज बुडाले होते. मे १५०३ मध्ये घडलेल्या दुर्घटनेत जहाजाचे कमांडर विसेन्ट सॉडरसह सर्वांना जलसमाधी मिळाली.

२०१३ मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहीम सुरु केली. वास्को द गामाच्या दुसऱ्या भारत दौऱ्यात दोन जहाजांपैकी एक जहाज वादळात बेपत्ता झालं होतं. सापडलेले अवशेष याच जहाजाचे असल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहचले आहेत. इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. 1499 मध्ये वास्कोच्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे.