भारतीय लष्कराची ३ अॅपवर बंदी

app
नवी दिल्ली – गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असणा-या ३ अॅपवर भारतीय लष्कराने बंदी घातली असून या अॅपच्या सहाय्याने पाकिस्तान भारतीय लष्कराची महत्वाची माहिती मिळवत असल्याचा धोका असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. भारतीय लष्कराने फेब्रुवारी महिन्यात जवानांना वीचॅट, स्मेश आणि लाईम हे अॅप डाऊनलोड न करण्याची सुचना दिली आहे.

याबाबत एका खाजगी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार याअगोदरच गुगलने स्मेश हे अॅप काढून टाकले आहे. पाकिस्तान या अॅपच्या सहाय्याने भारतीय लष्कराच्या जवानांवर लक्ष ठेवत असल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर हे अॅप काढून टाकण्यात आले होते. लष्कराच्या तुकड्यांची हालचाल तसेच दहशतवादी हल्ल्याविरोधातील कारवाईची माहिती या अॅपच्या सहाय्याने पाकिस्तानला मिळत होती.

तसेच जवानांना भारतीय लष्कराने लोकेशन नोटिफिकेशनदेखील बंद ठेवण्यास सांगितले आहे. आयएसआय सॉफ्टवेअरच्या सहाय्याने भारतीय जवानांचे स्मार्टफोन टॅब करुन ही मिळवत असल्याचे तपासात समोर आले होते. पठाणकोट हल्लावेळीदेखील जवानांच्या हालचालीची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी हँण्डलर याच पद्धतीचा वापर करत असल्याचं तपासात स्पष्ट झाले होते.

Leave a Comment