सर्वांत कमी जाडीच्या भिंगाची निर्मिती; ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांचा दावा

glass
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी जगातील सर्वात पातळ किंवा कमी जाडीचे भिंग तयार केल्याचा दावा केला असून हे भिंग मानवी केसाच्या पेक्षा २ हजार पट सडपातळ असे असून तो अब्जांशतंत्रज्ञानाचा म्हणजे नॅनोटेक्नॉलॉजीचा सर्वोत्तम आविष्कार आहे. ६.३ नॅनोमीटर एवढी या भिंगाची जाडी असून त्याची तुलना करता पूर्वीचे भिंग ५० नॅनोमीटर जाडीचे होते. ‘एबीसी न्यूज’ ने दिलेल्या बातमीनुसार हे भिंग ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठाच्या येरूई लॅरी ल्यू यांनी यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांनी तयार केले आहे.

वैज्ञानिकांच्या मते या भिंगाचे खूप क्रांतिकारी उपयोग आहेत वैद्यक, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात तर त्याचा वापर होईलच शिवाय लवचीक अशा संगणक पडद्यांसाठीही त्याचा वापर होईल. नवीन भिंगाच्या तंत्रज्ञानाचा वापर काही दूरचित्रवाणी संचांच्या व संगणक पडद्यांच्या प्रारूपात केला असून संगणकाचे व दूरचित्रवाणीचे पडदे गुंडाळूनही ठेवता येईल. त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्यास उत्पादन खर्चही कमी होणार आहे. या भिंगात वापरलेला पदार्थ हा आगामी लवचीक पडद्यांमध्ये वापरला जाईल, असे ल्यू यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकांनी तयार केलेल्या भिंगाचे उपयोग कीटकांच्या डोळ्यातील सूक्ष्म भिंगांची नक्कल करण्यासाठी होईल. ल्यू यांनी ‘नॅनो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीम लॅबोरेटरी’ या संस्थेत प्रयोग केले असून त्यात मॉलिब्डेनम डायस ल्फाइडचा स्फटिक वापरला आहे. वैज्ञानिकांनी या स्फटिकांचे अणू पातळीवरील थर वेगळे केले व त्यातून एक घुमटाकार असलेले भिंग तयार करण्यात आले.आयन किरणांच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा वापर यात करण्यात आला. ती प्रक्रिया इलेक्ट्रोनिक उत्पादनात वापरली जाते. अंतिम भिंग तयार करताना काही वेळा चिकटपट्टीचाही वापर करण्यात आला. ल्यू यांनी सांगितले, की प्रकाश जेव्हा अणूइतक्या सूक्ष्म पातळीवरील भिंगातून जातो, तेव्हा खूप वेगळे फायदे होतात. त्यामुळे आगामी काळात अगदी लहान पण दर्जेदार छायाचित्रे देणारे कॅमेरेही तयार करता येतील.

Leave a Comment