सराफा उद्योगाला कोट्यवधींचा फटका

jwellers
नवी दिल्ली : सराफा उद्योगाचे तब्बल १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान सराफा अर्थात सोन्या-चांदीच्या व्यापा-यांच्या देशव्यापी बेमुदत संपामुळे झाले आहे. या आंदोलनाची पुढील रणनिती ठरविण्यासाठी बैठक होणार आहे. ऑल इंडिया जेम्स आणि ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष जी.व्ही. श्रीधर यांनी सांगितले की, ११ दिवसांपासून सराफांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे रत्न आणि ज्वेलर्स उद्योगाला १५ हजार कोटींचा फटका बसला आहे. एवढेच नाही तर सरकारला देखील व्हॅटसह इतर कराबाबत दोन हजार कोटी रुपयांच्या महसूलाचे नुकसान झाले आहे.

जी.व्ही. श्रीधर यांनी सांगितले की, संपाच्या संदर्भात सराफा व्यापा-यांच्या विविध संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारसोबत पुढे केली जाणारी चर्चा आणि विरोध याबाबत ठरविले जाणार आहे. सराफा व्यापा-यांची संघटना ऑल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. के. जैन यांनी येथे सांगितले की, अर्थसंकल्पीय प्रस्ताव मागे घेतला जात नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहिल.

मागील सोमवारपासून सराफा व्यापारी संपावर आहेत. मात्र त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारकडून कोणतेही सकारात्मक संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे हा संप बेमुदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार लवकरच यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षाही जैन यांनी व्यक्त केली. आठवडाभरात सराफा व्यापार बंद आहे. त्यामुळे सराफांचे मोठे नुकसान होत आहे. देशातील विविध छोट्या मोठ्या शहरांमधील सराफा व्यापा-यांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.

Leave a Comment