रेल्वेच्या ‘क्लीन माय कोच’चे लोकार्पण

clean-my-coach
नवी दिल्ली – रेल्वेगाडय़ांमधील स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘क्लीन माय कोच’ या सेवेचे लोकार्पण केले आहे. या सेवेचा लाभ प्रवाशांना केवळ एका एसएमएसद्वारे घेता येणार आहे. तसेच मोबाईल ऍप व वेबसाईटवरही तक्रार नोंदवता येणार आहे. प्रवाशांना या ऑनलाईन सुविधेमुळे तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहे. रेल्वेने ही सेवा ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’ अशी घोषणा घेऊन सुरू केली असल्याचे रेल्वेमंत्री प्रभू यांनी सांगितले.

यामुळे कोचमधील स्वच्छतेबाबत सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवाशांनी यासाठी केवळ ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा आहे अथवा अँड्रॉईड मोबाईलवर ऍप डाऊनलोड करून तक्रार नोंदवता येणार आहे. याशिवाय यासाठी ‘क्लीनमायकोच.कॉम’ ही वेबसाईटही तयार करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीची नोंद घेतल्याचा एसएमएसही तात्काळ त्यांना मोबाईलवर पाठवण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत ही सुविधा उपलब्ध करून दिली जात असून यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सुविधा रेल्वेमार्फत देण्याचा प्रयत्न असेल. यासाठी प्रवाशांनी सर्वतोपरी सहकार्य करून रेल्वे स्वच्छ राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे.

Leave a Comment