मोदींना भेट केली लाकडावर कोरलेली गीता

sandeep-soni
कानपूर – कानपूरमधील संदीप सोनी (वय ३२) यांनी लाकडावर कोरलेली गीता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली. ही गीता बनविण्यासाठी संदीप यांना तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर पंतप्रधान कार्यालयकडून त्यांना बोलावणे आले आणि त्यांनी ही गीता पंतप्रधानांना भेट दिली.

सर्व १८ अध्याय आणि ७०६ श्‍लोकांचा लाकडावर कोरलेल्या या गीतेमध्ये समावेश आहे. संदीप यांनी आई सरस्वती आणि एका मित्रासह पंतप्रधानांची भेट घेऊन ही भेट त्यांच्याकडे सुपूर्त केली. याबाबत मोदी यांनी ट्‌विटरवरून फोटोसह माहितीही दिली होती. पंतप्रधानांना भेटल्यानंतर मी भावूक झालो होतो. त्यांना भेटण्याची माझी इच्छा पूर्ण होईल याची मला तिळमात्र खात्री नव्हती. परंतु त्यांनी माझी भेट घेतली आणि माझ्या कलेचे कौतुकही केल्याची माहिती संदीप यांनी या वेळी दिली.

या भेटीमध्ये मोदींसमोर संदीप यांनी “मेक इन इंडिया‘मार्फत व्यवसाय सुरू करण्याची इच्छाही बोलून दाखविली. या वेळी मोदींनीही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना मदत करण्यास सांगितले. केवळ नऊ हजार महिना कमविणाऱ्या संदीप यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मागच्या महिन्यात ही कलाकृती देण्यास बोलाविले होते. परंतु त्या वेळी त्यांची पंतप्रधानांसोबत भेट झाली नव्हती.