तोटा भरून काढण्यासाठी छोटे थांबे बंद होणार

rail
दिल्ली- जास्त महसूल नाही, प्रवाशांची संख्याही जास्त नाही मात्र मेल अथवा एक्स्प्रेस चा थांबा आहे अशा रेल्वे स्टेशनवरचे थांबे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दोन मिनिटांसाठी छोट्या स्टेशनवर मेल अथवा एकस्प्रेसचा थांबा असेल तर रेल्वेला किती खर्च करावा लागतो याचे सर्वेक्षण केले असून असे सर्वेक्षण रेल्वेच्या इतिहासात प्रथमच केले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मेल अथवा एकस्प्रेस दोन मिनिटांसाठी छोट्या स्टेशनवर थांबविण्यासाठी येणारा खर्च हा गाडीला किती कोच आहेत त्यानुसार ठरत असतो. तसेच डिझेल इंजिन आहे वा इलेक्ट्रीक इंजिन आहे त्यावरही खर्च कमी जास्त होतो. १२० किमीच्या वेगाने जाणार्‍या २४ डब्याच्या गाडीला दोन मिनिटांचा थांबा देण्यासाठी येणारा खर्च २३५७८ रूपये आहे. हाच खर्च १०० किमी वेगाच्या २० डब्यांच्या गाडीसाठी २१२०७ रूपये येतो. इलेक्ट्रीक इंजिनचा खर्च तुलनेने कमी येतो. शिवाय असे थांबे दिल्याने प्रवासाचा वेळ वाढतो ते वेगळे.

बरेचदा असे दिसते की आमदार, खासदार अथवा खुद्द रेल्वे मंत्र्यांचे स्वतःचे खास इंटरेस्ट अथवा लहान मोठे राजकीय नेते त्यांच्या मतदार संघांसाठी असे थांबे रेल्वे रोको सारखी आंदोलने करून पदरात पाडून घेतात. रेल्वे सध्या आर्थिक संकटात आहे व जितका खर्च वाचविणे शक्य आहे, तितका वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे असे थांबे बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

रेल्वे प्रशासनातील अधिकारी म्हणाले आजपर्यंत दबाव आणून एखादा थांबा करून घेतला जायचा तेव्हा दोन मिनिटे गाडी थांबली तर काय नुकसान होणार आहे असा प्रश्न हमखास यायचा. त्यावेळी आमच्याकडे उत्तर नव्हते मात्र आता दोन मिनिटांसाठी रेल्वेला किती खर्च येतो याची आकडेवारीच उपलब्ध झाल्याने मोठीच सोय झाली आहे.

Leave a Comment