कॉर्पोरेट नोकरी सोडून अभियंता बनला शेतकरी

vinoth-kumar
चेन्नई: ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग’ची पदवी. त्याच्या जोडीला ‘एचआर’मधील एमबीए. अर्थातच त्याला एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदाची नोकरी मिळाली. मात्र चार वर्षातच कामातील तोचतोचपणा त्याला नकोसा झाला. त्याने नोकरीत ‘ब्रेक’ घेऊन देश पाहण्याचे ठरविले आणि या भटकंतीने त्याला प्रेरणा दिली पूर्णवेळ शेतकरी बनण्याची! या क्रांतिकारक विचारला अमलात आणून त्याने यशस्वी करून दाखविले आणि आता तो सेंद्रीय शेतीचा प्रसार आणि मार्गदर्शनही करतो आहे. त्यामुळे त्याचे शेत हे शेतकरी आणि अभ्यासकांसाठी तीर्थस्थळ बनले आहे.

चेन्नईमधील एका शाळेतील प्राचार्यांचा मुलगा असलेला विनोद कुमार हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला मुलगा. विद्युत अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्राची पदवी घेऊन एका कंपनीत नोकरीला लागला. इमाने इतबारे काम करायचा. कधी कधी कामासाठी दिवस अपुरा पडायचा आणि रात्रही! त्यामुळे मित्रांबरोबर भेटणे नाही; की नातेवाईकांकडे जाणे नाही. कामातही काही नावीन्य नाही. त्यामुळे चार वर्षातच तो आपल्या नोकरीला कंटाळला. तब्बल ४० वर्ष अध्यापनाचे काम करणारे आपले पिता अजूनही त्यांच्या शिकविण्याच्या कामात झोकून कसे देऊ शकतात; असा प्रश्न त्याला पडू लागला.

या रुटीनच्या रामरगाड्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने साठविलेल्या पैशातून देशाटन करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्याच्या निरीक्षणातून त्याला शेतकऱ्यांची वेदना समजली. काहीही करून शेतीमध्ये नफा मिळत नसल्याने आपल्या मुलांनी शेतीचा व्यवसाय करू नये; ही शेतकऱ्यांची प्रातिनिधिक आणि सार्वत्रिक भावना! मात्र काही ठिकाणी पारंपारिक ज्ञानाच्या आधारे काही यशस्वी प्रयोगही त्याला दिसून आले. या देशाटनाने विनोद कुमारच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्याचे वडील शिक्षक असले तरी चेन्नईपासून ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चेय्युर या गावात त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित शेती होती. त्याचे वडील हंगामात गावात जाऊन अर्धवेळ शेती करायचे. त्यामुळे मालकीची जमीन होती. पारंपारिक ज्ञानाचे गाठोडे होते. त्याचबरोबर प्रवासात निरीक्षणाने टिपलेल्या अनुभवांची शिदोरी होती.

विनोद कुमारने शास्त्रीय पद्धतीने सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. कमीतकमी खर्चात फायदेशीर शेती करायची असेल तर सेंद्रीय शेतीला पर्याय नाही; हे विनोद कुमारचे ठाम मत आहे आणि अनुभवही! सन २०१४ पासून विनोद कुमार शेती करीत आहे. त्याच्या शेतात ज्वारी, बाजरी, डाळींची पिके आणि तेलबिया पिकतात. या सर्व पिकांना कमीत कमी पाण्याची आवश्यकता असल्याने त्याने या पिकांची निवड केली आहे. शिवाय डाळी आणि तेलबियांना मागणीही चांगली असते आणि दरही चांगला मिळतो.

रासायनिक खतांचा वापर करून सरसकट सेंद्रिय शेती सुरू केल्याने पहिल्या वर्षी पिकांच्या उत्पादनात मोठी घट होते. ही घट सहन करणे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना शक्य नसते. त्यामुळे टप्प्या टप्प्याने रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खते, आलेल्या पिकातूनच विकसित केलेली बियाणे वापरण्यास सुरुवात करावी; असे विनोद कुमार सांगतो.

सेंद्रीय शेतीचा प्रसार करण्यासाठी कोणतीही भाषणबाजी न करता विनोद कुमार फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवरील खर्चाचा हिशोब मांडून ठेवण्यास सांगतो. त्याचा लेखा जोखा पाहून शेतकऱ्यांनाच रासायनिक खाते, कीटकनाशके, संकरीत बियाणे याच्या खर्चाने त्यांचा नफा खाल्ल्याचे लक्षात येते. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना सुरुवातीला उत्पन्न नगण्य असले तरी तीन ते चार हंगामात उत्पन्नात भरघोस वाढ होते आणि मुख्य म्हणजे बाजारातून काहीच आणावे लागत नसल्याने बियाणे, औषधे, खते याचा खर्च शून्य! त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे सर्व उत्पन्न हा त्याचा नफाच असतो.
शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या अनेक योजना आहेत. पण त्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी त्यापासून वंचित राहतो. हे लक्षात घेऊन विनोद कुमारने सेंद्रीय शेतीच्या प्रसाराबरोबर शेती विषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशाच्या विविध भागातील आणि अन्य आशियायी देशांमधील शेती करण्याच्या पारंपारिक ज्ञानाची माहिती घेऊन ती लिखित स्वरूपात संकलित करण्याचे कामही त्याने हाती घेतले आहे.

Leave a Comment