पर्यटन वाढीसाठी थायलंडने सहकार्य करावे

devendra-fadnvis
मुंबई : व्हिजीट महाराष्ट्र इयर म्हणून महाराष्ट्र राज्य २०१७ हे वर्ष साजरे करणार असून महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी थायलंडने सहकार्य करावे असे आवाहन आणि अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. थायलंडचे उपपंतप्रधान जनरल थानासाक प्रतिमाप्रकोण आणि त्यांचे शिष्टमंडळ मुंबईच्या तीन दिवसीय दौ-यावर आहेत.

या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमीत मलिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अभय यावलकर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव आर. के. धनावडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत वैभवशाली राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा या, असे आवाहनही त्यांनी थायलंडचे उपपंतप्रधान जनरल थानासाक आणि त्यांच्या शिष्टमंडळाला केले.

देश विदेशातून येणा-या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा यासाठी प्रयत्न होत आहेत. वेरुळ, अजिंठा असो किंवा मग नागपूरची दीक्षाभूमी असो, महाराष्ट्रातील पर्यटन अनुभवण्यासाठी आपण शिष्टमंडळासह पुन्हा महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबई ही चित्रपट क्षेत्राचीही राजधानी म्हणूनच ओळखली जाते. आगामी काळात थायलंडलाही या क्षेत्रात काम करताना मुंबईचा इतिहास गिरवायला आवडेल.

Leave a Comment