ग्रामीण महिला उद्योजिकांसाठी केंद्राची ‘ई हाट’

maneka
नवी दिल्ली: ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने ‘ई हाट’ योजनेंतर्गत वेबसाईटच्या माध्यमातून ई प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी ‘ई हाट’ची घोषणा केली.

ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला दूरवर असलेल्या बाजारपेठेत जाऊन आपल्या उत्पादनांची विक्री करू शकत नाहीत. अशा महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही वेबसाईट अव्याने विकसित करण्यात आल्याचे गांधी यांनी सांगितले.

या वेबसाईटच्या माध्यमातून महिला तयार कपडे, सेंद्रीय उत्पादने, खेळणी अशा प्रकारच्या उत्पादनांची विक्री करता येणार असून त्यासाठी महिलांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही; असेही त्यांनी नमूद केले. या माध्यमातून उत्पादक आणि ग्राहक यांना एकत्र आणले जात असून कोणीही या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची विक्री करू शकेल; असे त्या म्हणाल्या. या वेबसाईटचे कामकाज मोबाईलच्या माध्यमातून केले जाणार असून ‘कस्टमाईज्ड ऑर्डर्स’ही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महिला बालकल्याण विभाग आणि ग्रामीण विकास विभाग हे संयुक्तपणे रोजगार विकास राष्ट्रीय मोहीमेवर काम करीत असून त्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे उपक्रम राबविले जाणार आहेत; असे गांधी यांनी सांगितले.

या वेबसाईटवर आपल्या उत्पादनाची नोंदणी करण्यासाठी महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनाची माहिती विशिष्ट स्वरूपात देणे आवश्यक आहे. त्यानंतर या वेबसाईटवर त्याचा समावेश करण्यात येईल. सध्या महिला उद्योजिकांना अनेक मध्यस्थांच्या माध्यमातून बाजारपेठ गाठावी लागत असल्याने त्यांच्या नफ्याचे प्रमाण अत्यल्प असते. मात्र या माध्यमामुळे अधिकाधिक नफा त्यांना मिळू शकेल; असे गांधी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment