काळ्या पैशांवर रिझर्व्ह बँकेचे धोरण

rbi
नवी दिल्ली : थेट विदेशी गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारने देशाची दारे खुली केली असली तरी या माध्यमातून विदेशातील काळा पैसा भारतात येऊ नये यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विदेशी गुंतवणुकीशी संबंधित काही विशिष्ट माहिती आयबी आणि रॉ यांसारख्या गुप्तचर संस्थांना उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नुकत्याच झालेल्या उच्च स्तरीय गटाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कर बुडविणा-यांसाठी नंदनवन असलेल्या देशांमधील अनेक कंपन्या आपला काळा पैसा भारतात आणत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आयबी आणि रॉ यांसारख्या गुप्तचर संस्थांचे नियंत्रण करणा-या कॅबिनेट सचिवालयाने गंभीर चिंता व्यक्त केली होती. याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. अशा कंपन्यांच्या काळ्या पैशांच्या स्त्रोतांचा शोध घेऊन तो भारतात येण्यापासून रोखण्याची आवश्यकता विषद करतानाच कॅबिनेट सचिवालयाने असेही सुचविले आहे की, अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाने अशा कंपन्यांची आणि त्यांच्याकडून भारतात होत असलेल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती प्राप्त करून ती साठवून ठेवावी; पण उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत नंतर आणखी एक प्रस्ताव सादर झाला.

विदेशी गुंतवणुकीबाबतची माहिती आरबीआयकडे उपलब्ध असल्याने देशातील या शिखर बँकेनेच त्यांच्याकडील विशिष्ट माहिती आयबी आणि रॉला उपलब्ध करून द्यावी. आरबीआयला हा प्रस्ताव मान्य झाला असून त्यानुसार आतापर्यंतची सर्व माहिती गुप्तचर संस्थांना देण्याचे धोरण आरबीआयने तयार केले आहे, असे सूत्राने सांगितले.

Leave a Comment