आयआयटीतील विद्यार्थ्यांनी बनविले स्फोटके हुंगणारे नाक

enose
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दीच्या ठिकाणीही स्फोटके हुंगू शकणारे नाक तयार केले असून हे पोर्टेबल इलेक्ट्राॅनिक नाक तयार करण्यात चार विविध विभागाच्या १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यासाठी भारत सरकारच्या प्रिन्सिपल सायंटिफिक अॅडवायझर कार्यालयाकडून अनुदानही दिले गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार गर्दीच्या ठिकाणी अनेकदा स्फोटके शोधण्यासाठी श्वान पथके नेणे गैरसोयीचे ठरते. या ठिकाणी ही सोपी पद्धत कामी येणार आहे. विशेष म्हणजे हे उपकरण नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून बनविले गेले आहे आणि दूर अंतरावरूनही ते संचालित करता येते. हे नाक मोबाईल फोनशी लिंक करता येते. इलेक्ट्राॅनिक्स विभागाचे प्रोफेसर व्ही रामगोपाल या संदर्भात माहिती देताना म्हणाले, यात पृष्ठभागावर केसासारखी बारीक रचना केली गेली असून ते सेंसरचे काम करतात. स्फोटके असलेल्या परिसरातील हवा आत घेऊन बाहेर टाकण्यासाठी एक पंप आहे. या हवेतून येणारे स्फोटकांचे कण नॅनो पार्टिकलवर चिकटतात. आरडीएक्स, ईएनटी अशा सारखी स्फोटके यातून शोधता येतातच पण विविध प्रकारचे कोटिंग केले तर विविध प्रकारची स्फोटकेही शोधता येतात. चालत्या वाहनांतही हे उपकरण वापरता येते. या उपकरणासाठी ५ ते १० हजार रूपये खर्च येतो.

Leave a Comment