शेणात दडलेली संपत्ती शोधणारे तरुण

gobar-gas
एम. टेक सारखे उच्चशिक्षण प्राप्त करणार्‍या कोणाही तरुणाला परदेशात जाऊन भरपूर पगाराची नोकरी करण्याचे वेध लागतात. परंतु भारतात असे काही वेडे तरुण आहेत की ज्यांनी हा मोह टाळून चक्क बायोगॅस संयंत्र निर्माण करणारी कंपनी स्थापन केली आहे आणि स्वतःच्या संशोधनातून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचे संयंत्र निर्माण केले आहे. या तरुणांनी आपल्या पध्दतीच्या ५०० संयंत्रांची विक्री आजपर्यंत केली असून दरवर्षी ५ हजार संयंत्रे विकण्याचे ध्येय ठेवले आहे. कौशिक एनमंद्रंम, पियूष सोहानी आणि शंकर रामकृष्णन यांनी हे साहस केले आहे. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवण्याची मळलेली वाट सोडून देऊन त्यांनी चक्क गाईच्या शेणात हात घातला आहे.

साधारण ३० वर्षे वयाचे असलेले हे तरुण महाविद्यालयात शिकत असल्यापासूनच या कल्पनेने भारलेले होते. कारण भारतामध्ये जनावरे भरपूर आहेत आणि त्यांचे शेण वाया जात असते. हे त्यांनी पाहिलेले होते. या शेणापासून गोवर्‍या तयार करून त्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. मात्र त्यामुळे देशातले मौल्यवान खत तर वाया जातेच पण गोवर्‍या जाळून स्वयंपाक करण्याने हवा प्रदूषित होते. शिवाय चुलीवर स्वयंपाक करणार्‍या महिलांना धुरामुळे श्‍वसनाच्या अनेक रोगांना बळी पडावे लागते. महाविद्यालयात शिकत असतानाच हे तिघेही हे दृश्य बघत होते. म्हणून त्यांनी याच क्षेत्रात काम करायचे ठरवले.

चेन्नईच्या आयआयटीशी निगडित असलेल्या व्हिलग्रो इनोव्हेशन फौंडेशन या संस्थेने त्यांना दरमहा २५ हजार रुपये स्टायपेंड आणि ३ लाख रुपयांचे भांडवल देऊ केले. त्यातून या मुलांनी स्वतःची टेक्नॉलॉजी विकसित केली आणि एखाद्या मोठ्या पिशवीसारखे बायोगॅस संयंत्र तयार केले. या संयंत्राला बसवायला फार वेळ लागत नाही. २५ हजार रुपयांमध्ये ते बसवले जाते आणि त्यातला गॅस घरात वापरला जातो. खाली राहिलेले शेण खत म्हणून उत्तम काम करते. भारतात ग्रामीण भागामध्ये १७ कोटी घरे आहेत. त्यातील ८ कोटी कुटुंबांकडे जनावरे आहेत. त्यातील अडीच ते तीन कोटी घरांना या संयंत्रांचा पुरवठा केला तर देशाचा करोडो रुपयांचा फायदा होईल असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या कंपनीचे नाव सस्टेन अर्थ एनर्जी सोल्यूशन्स असे असून त्यांचे काम दहा राज्यात चालते.

Leave a Comment