२० दिवस आधीच फुलले टय़ुलिप गार्डन

tulip-garden
श्रीनगर – यंदा सुमारे २० दिवस आधीच काश्मीरमध्ये येणा-या पर्यटकांचे खास आकर्षण ठरलेले श्रीनगर येथील टय़ुलिप गार्डन फुलले आहे. उबदार हवामान वातावरणामध्ये झालेल्या समाधानकारक बदलामुळे निर्माण झाले आहे. परिणामी सुमारे एक हजार अधिक झाडांना कळय़ा धरल्या असून त्या फुलू लागल्या आहेत. हा बगिचा लवकरच पर्यटकांसाठी खुला केला जाईल, असे फलोद्यान विभागाचे संचालक तलत परवेझ यांनी सांगितले.

श्रीनगरचे तापमान गेल्या सुमारे ७६ वर्षांत यंदा प्रथमच फेब्रुवारी महिन्यात २० अंशावर आले आहे. एरवी हे तापमान १० अंशाच्या आसपास असते. मार्च महिन्याच्या तिस-या आठवडय़ानंतर हवामानात बदल होतो. मात्र यंदा लवकरच हवामान उबदार झाल्याचा फायदा या उद्यानाला झाल्याचे मानण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००७ साली झरबान पवर्तरांगाच्या पायथ्याशी सुमारे २० एकर परिसरामध्ये या उद्यानाची निर्मिती केली होती. २००८ पासून हे उद्यान पर्यटकांसाठी खुले झाले आणि तेव्हापासून काश्मीरला येणारा पर्यटक टय़ुलिप गार्डनला भेट देत आला आहे.

याबाबत माहिती देताना फलोद्यान विभागाचे सहाय्यक इम्रान अहमद यांनी सांगितले की, या बगिच्यामधील सुमारे १ हजार झाडांच्या कळय़ा सध्या मोहरू लागल्या आहेत. मार्च महिन्याच्या दुस-या आठवडय़ाच्या शेवटी-शेवटी एरवी ही प्रक्रिया सुरू होते. मात्र यंदा लवकरच हंगाम सुरू झाला आहे. गेल्या तीन वर्षांत एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात हा बगिचा खुला होत असे. मात्र यंदा सुमारे २० दिवस आधीच हा हंगाम सुरू होत आहे. टय़ुलिप फुलांचा खजिना मानल्या जाणाऱया नेदरलँडमध्येही या फुलांचा हंगाम गेल्या काही वर्षांपासून एप्रिलमध्येच सुरू होत आहे. परंतु काश्मीरमध्ये मात्र यंदा लवकर सुरू झाल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment