लेईकोने अवघ्या ३० दिवसांत विकले २ लाख स्मार्टफोन

leeco
मुंबई – भारतीय बाजारपेठेत चीनमधील स्मार्टफोन कंपनी लेईकोने धुमाकूळ घातला असून लेईको ले मॅक्स आणि लेईको ले १ एस या दोन स्मार्टफोन्सची विक्रमी विक्री झाली आहे. लेईको कंपनीकडून गेल्या ३० दिवसांमध्ये तब्बल २ लाखांहून अधिक स्मार्टफोन्सची विक्री झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात सुपरफोनच्या नावाने २० जानेवारीला लॉन्च केले होते.

लेईको कंपनीने तयार केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती १० हजार ९९९ रुपयांपासून अगदी ६९ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर हे स्मार्टफोन विक्रीसाठी ठेवले आहे. लेईको कंपनी याआधी केवळ लेटीव्हीसाठी प्रसिद्ध होती. ले मॅक्स या ६४ जीबी स्टोरेज मॉडेलला सिल्व्हर कलरमध्ये लॉन्च केले असून त्याची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे. यामध्ये हँडसेटचा १२८ जीबी स्टोरज असणारा गोल्ड व्हेरिएंटही आहे. गोल्ड व्हेरिएंटची किंमत सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची संख्या मार्यादित आहे. यामधील गुलाबी रंगाचा स्मार्टफोन ६९ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.

‘ले १ एस’ या स्मार्टफोनला १३ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर ले मॅक्सला २१ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आणि ४ अल्ट्रापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.ले मॅक्स स्मार्टफोन गेल्याच वर्षी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर ले १ एस स्मार्टफोन ऑॅक्टोबर २०१५ मध्ये लॉन्च झाला होता.

Leave a Comment