मद्यसम्राटाच्या अटकेसाठी कर्जवसुली लवादाकडे धाव

vijay-mallya
मुंबई – मद्यसम्राट विजय माल्या यांच्या अटकेची मागणी स्टेट बँक ऑफ इंडियाने केली आहे. त्याचबरोबर बँकेने त्यांचा पासपोर्ट जप्त करावा अशीही मागणी केली आहे. युबी समुहाचे प्रवर्तक असलेले विजय माल्या यांनी बँकेचे कर्ज बुडवल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी बँकेने कर्ज वसुली लवादाकडे धाव घेतली आहे.

माल्या यांच्याकडे असलेली ७००० कोटी रुपयांची कर्जाची रक्कम बँकेला वसूल करावयाची आहे. माल्या यांना कर्ज देणाऱ्या १७ संस्थांचे नेतृत्व यामध्ये स्टेट बँक करत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवादाकडे माल्या यांच्या अटकेसाठी बँकेने ४ अर्ज केलेले आहेत. त्यामध्ये त्यांचा पासपोर्टही जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. युनायटेड स्पिरिट्स सोडण्यासाठी माल्या यांना ७५ दशलक्ष डॉलरचे पॅकेज मिळणार आहे. त्यावर पहिला हक्क सांगण्यासाठी बँकेने त्यांच्या अटकेची आणि पासपोर्ट जप्तीच्या कारवाईची मागणी केली आहे. बँकेने याबाबतची माहितीही लवादाला सुपू्र्त केली आहे.

माल्यांविरुद्धच्या या कारवाईमध्ये प्रामुख्याने पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, युको बँक आणि देना बँक या बँकांचा समावेश आहे. मागच्या वर्षी स्टेट बँकेने माल्या यांची दिवाळखोरी जाहीर केली होती.

Leave a Comment