बंद होणार रिंगिंग बेल्सचे मुख्य कार्यालय

ringing-bells
नवी दिल्ली – नोएडा सेक्टर ३६ मधील आपले मुख्य कार्यालय बंद करण्याचा निर्णय रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच २५१ रुपयांचा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम २५१’ कंपनीने सादर केला होता. इमारत मालकाने कंपनीला नोटीस दिल्यामुळे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्यालय कंपनीने ११ महिन्यांसाठी भाडय़ाने घेतले होते. कंपनीचे मुख्य कार्यालयच बंद होत असल्याने कंपनीबाबत उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत एक निवेदन कंपनीकडून जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व बाबी स्पष्ट केल्या जातील. कंपनी सध्या दुस-या ठिकाणी कार्यालय उघडण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र त्याबाबत कोणतीही माहिती सध्या कंपनीकडून देण्यात आलेली नाही. कंपनीने ग्राहकांना ७.३५ कोटी स्मार्टफोन घरपोच देण्याचा शब्द दिला होता. ग्राहकांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नसून, कंपनीकडून दिली गेलेली सर्व आश्वासने पाळण्यात येतील, असे कंपनीच्या सूत्रांनी माहिती देताना सांगितले. सहा भारतीय संस्थासोबत कंपनीने करार केले आहेत. या सर्व संस्था स्मार्टफोन निर्मितीसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत. सध्या काही समस्या असल्यातरी कंपनी आपली आश्वासने पूर्ण करणार आहे.

Leave a Comment