घरबसल्या मिळणार बँकिंग सुविधा

banking
नवी दिल्ली : आज आपल्याला पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी थेट बँकेचा रस्ता पकडावा लागतो. परंतु आता अशी सुविधा थेट घरातच मिळण्याची सोय होणार आहे. अर्थात, घरबसल्याच आपण पैसे काढणे आणि जमा करण्याच्या सुविधेचा लाभ घेणार आहोत. त्यासाठी मायक्रो एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, हे एटीएम घेऊन थेट पोस्टमनच घरी पोहोचणार आहे.

सप्टेंबर महिन्यापासून ही सुविधा भारतीय डाक विभाग उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे बँक खाते कोणत्याही बँकेत असले, तरी मायक्रो एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सेवेसाठी ग्राहकांना अतिरिक्त चार्ज देण्याची अजिबात गरज नाही. विनामूल्य सेवा देण्याचे काम पोस्टमन करणार आहे. विशेष म्हणजे अलिकडे काळाच्या ओघात डाक खात्याचे काम कमी झाले आहे. कारण पूर्वी पत्र पाठवून एकमेकांना संदेश दिला जायचा.

तसेच तारेचीही जलद सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली होती. मात्र, अलिकडे संदेशाची थेट सुविधा उपलब्ध झाल्याने डाक खात्याच्या कार्याला मरगळ आली होती. परंतु डाक विभाग अधिक सक्रीय करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. त्यातूनच डाक कार्यालयांमार्फत नवनव्या सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच मायक्रो एटीएमची सुविधा पुढे आली आहे.

Leave a Comment