बंगळूरू – आता सर्वांसाठी बंगळुरूमध्ये अपघातात शरीराचे दोन तुकडे झालेला हरिश प्रेरणास्थान ठरला असून आपल्या गावकऱ्यांसमोर त्याने एक सकारात्मक विचार ठेवला आहे. माझे अवयव दान करा असे हरिशने मृत्यूवेळी डॉक्टरांना सांगितले आणि हरिशच्या मृत्यूनंतर त्याचे दोन्ही डोळे दान करण्यात आले. आता त्याचा वारसा जपत कारेगौडानहाली गावातील ३०० पैकी १७० रहिवाश्यांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
गावकरी चालवणार हरिशच्या अवयवदानाचा वारसा
हरिशच्या अकराव्याला एका गावकऱ्याचा आम्हाला फोन आला. आमच्या गावकऱ्यांना नेत्रदानाचे फॉर्म भरायची इच्छा आहे, असे त्यांनी फोनवर सांगितल्याची माहिती नारायण नेत्रालयाचे संचालक डॉ. भुजंग शेट्टी यांनी दिली. हरिशच्या आई गीताम्मा यांनीही नेत्रदानाचा निश्चय केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अवयवदानाविषयी गैरसमजुती न बाळगता केलेला हा निर्णय सुखद असल्याचे नेत्रपेढीतर्फे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे यात वय वर्ष ११ पासून ८२ वर्षांपर्यंत विविध वयोगटातील १७० व्यक्तींचा समावेश आहे. याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील दीडशे गावकरी अवयवदानाचा फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत.