सोन्याच्या झुल्यावरून यंदा बाकेबिहारी खेळणार होली

vrindavan
वृंदावन- जगभरात प्रसिद्ध असलेल्या व लक्षावधी परदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वृंदावनच्या होळीत यंदा बाकेबिहारी सोन्याच्या झुल्यावरून होळी खेळणार आहेत. दरवर्षी येथे कांही तरी नवीन सजावट केली जाते.त्यानुसार यंदा गर्भागारातून बाहेर आल्यानंतर बाकेबिहारी सोन्याच्या झुल्यावर विराजमान होतील व त्यानंतर भक्तांवर रंगाची बरसात होईल.

येथील जगप्रसिद्ध बाकेबिहारी मंदिरात परंपरेनुसार वसंतपंचमीपासून गुलाल होळी खेळण्याची सुरवात होते. होळीचा मुख्य कार्यक्रम १९ ते २३ मार्च या दरम्यान होणार असून त्या काळात नैसर्गिक रंगांचा वापर करूनच होली खेळली जाते.यासाठी फुले सुकवून त्यापासून रंग बनविला जातो. कोलकाता येथून दीड क्विटल फुले आणली गेली आहेत. या फुलांपासून बनविलेला रंग प्रथम गोपालकृष्णावर शिंपडला जातो व नंतर भक्तांवर उधळला जातो. यंदा चांदीच्या पिचकारीतून हा रंग उडविला जाणार आहे. रंगभरणीचा कार्यक्रम एकादशीला असून त्यादिवशी झेंडू, गुलाब, निशिगंधाच्या पाकळ्या उधळल्या जातात. त्यासाठी १ टन फुलांचा वापर होतो.

Leave a Comment