सत्यमेव जयते

isharat-jhan
इशरत जहॉं या तरुणीसह चौघा अतिरेक्यांना बनावट चकमकीत ठार मारल्याच्या प्रकरणात नेमके सत्य काय होते यावर गेली ११ वर्षे सतत उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु शेवटी सत्याचा विजय होतो आणि कारस्थाने करणारे उघडे पडतातच. या वस्तुस्थितीचा अनुभव या प्रकरणात यायला लागला आहे. इशरत जहॉं ही तरुणी आपल्या मित्राबरोबर ठाण्यावरून अहमदाबादला आली होती आणि रात्रभर प्रवास करून ती तिघा अतिरेक्यांबरोबर पहाटे पहाटे अहमदाबाद शहरात पोहोचायला लागली तेव्हा तिच्यासह चौघांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यासाठी झालेली चकमक खरी की खोटी हा वादाचा विषय आहे आणि तो कायम वादाचा राहील. परंतु या प्रकरणातला अगदी मिलियन डॉलर क्वेश्‍चन म्हणजे सर्वात निकडीचा प्रश्‍न आहे तो इशरत जहॉंबद्दलचा ती अतिरेकी होती की नव्हती या प्रश्‍नावर प्रदीर्घ चर्चा होत आलेली आहे आणि त्या संबंधीचे सत्य हळूहळू प्रकट व्हायला लागले आहे. इशरत जहॉं ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातली तरुणी होती. तिला वडील नव्हते आणि ती शिकवण्या घेऊन कुटुंबाला मदत करत असे.

ती अतिरेकी नव्हती असे तिच्या समर्थकांचे म्हणणे आहे. परंतु हे प्रकरण एवढ्यावरच संपलेले नाही. तिला ठार मारणारे पोलीस हे गुजरातमधल्या नरेंद्र मोदी सरकारचे पोलीस होते आणि त्यांनी एका निरपराध मुस्लीम तरुणीला बनावट चकमकीत ठार मारून मुस्लीम समाजावर मोठा अन्याय केला आहे असे चित्र उभे करण्यात आले आणि त्यातून मुस्लीम समाजात मोदींविषयी नफरत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मग हीच गोष्ट अधिक प्रखरतेेने करता यावी म्हणून इशरत जहॉंला महात्मा ठरवण्यात आले. ठाण्याचे अतिउत्साही राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत दिली. तिच्या नावाने एक रुग्णवाहिका सुरू केली. ती निरपराध होती हे एक वेळ वादासाठी मान्य केले तरी निरपराध मारले गेलेल्या तरुणीला एवढे महत्त्व द्यायचे कारण काय असा प्रश्‍न निर्माण होतो. रोहित वेमुला, याकूब मेमन आणि अफझल गुरु यांच्या संबंधाने असेच प्रयत्न झाले आहेत. याकूब आणि अफझल गुरुला फाशी द्यायला नको होती हे एकवेळ वादासाठी मान्य केले तरी त्यांना फाशीच्या ऐवजी जन्मठेप द्यायला हवी होती हे सर्वांना मान्यच आहे. परंतु त्यांना फाशी दिली म्हणून ते काही महात्मा ठरत नाहीत. मात्र त्यांना तसे ठरवले जाते कारण त्यांना समोर ठेवून नरेंद्र मोदींच्या विरोधात राजकारण करणे सोपे असते.

इशरत जहॉंच्या संदर्भात असेच राजकारण झाले आहे. हे आता दिसून यायला लागले आहे. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार हेडली याने इशरत जहॉं अतिरेकीच होती असे निःसंदिग्धपणे सांगितले. तोपर्यंत तरी इशरतला मोदींनी चकमकीतच ठार मारले असे जणू सिध्द झाल्यासारखे वातावरण होते. मात्र त्याला धक्का बसला. पोलिसांनी आणि गुप्तचर संघटनांनी इशरत जहॉं अतिरेकीच होती असे सुरूवातीला म्हटले होते आणि तिच्या विरोधात तसा अहवालही दाखल झाला होता. परंतु तेव्हा सत्तेवर असलेले यूपीएचे सरकार इशरतच्या प्रेतावरून मोदी विरोधी राजकारण करण्यास एवढे उद्युक्त झाले होते की त्या सरकारने हा अहवाल बदलला. त्यावेळी पी. चिदंबरम् हे गृहमंत्री होते. त्यांनी तो अहवाल बदलला आणि इशरत जहॉं ही अतिरेकी नव्हती असा खोटा उल्लेख अहवालात करायला लावला. हे सारे कारस्थान गृहखात्यात चाललेले होते. तेव्हा गृहसचिव असलेले श्री. पिलाई यांनीही आता इशरत संबंधीचा अहवाल गृहमंत्र्यांनीच बदलला असा गौप्यस्फोट केला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील हे घाणेरडे राजकारण करण्यात चिदंबरम् यांचा प्रत्यक्ष हात होता.

श्री. पिलाई यांच्या गौप्यस्फोटाला दोन दिवस होत नाहीत तोच केंद्रीय गृहखात्यातील सुरक्षा विभागातील सेवा निवृत्त अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनीही या गौप्यस्फोटाला दुजोरा दिला आहे. इशरत जहॉं ही अतिरेकी असतानाही तिला क्लिन चिट देणारा अहवाल तयार करण्यात आला. तो नकली अहवाल मणी यांनीच तयार केला. त्यांनी सुरूवातीला खरा अहवाल दिला होता आणि इशरत जहॉं ही अतिरेकी संघटनेची सदस्य असल्याचे अनेक पुरावे त्याला जोडले होते. मात्र त्यांच्या या खर्‍या अहवालावरून मोदी विरोधी राजकारण करण्याची संधी सरकारला मिळत नव्हती. म्हणून मणी यांना हा अहवाल बदलायला लावण्यात आला. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. एवढेच नव्हे तर त्यांना काही दिवस दहशतीखाली रहावे लागले. पोलीस ठाण्यामध्ये आरोपीचा थर्ड डिग्री मेथडने छळ करतात तसा मणी यांचा छळही करण्यात आला. हे सारे प्रकरण आता उघड झाले आहे आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाने तसेच मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जातीयवादाचा आधार घेऊन किती खालच्या थराचे राजकारण केले होते हे लोकांना दिसायला लागले आहे. या सार्‍या प्रकरणात असे राजकीय स्वरूपाचे आरोप न करता न्यायालयात जाऊन या सार्‍या घटनांची तड लावली पाहिजे तरच अशा राजकारणाला आळा बसेल.

1 thought on “सत्यमेव जयते”

Leave a Comment