प्रदूषणामुळे आग्नेय आशियात कर्करोगात वाढ

cancer
नवी दिल्ली : वायुप्रदूषण सध्या कर्करोगाला कारणीभूत असून आग्नेय आशियामध्ये प्रदूषणामुळेच कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. जगातील २० प्रदूषित शहरांपैकी १४ शहरे आग्नेय आशियामध्ये आहेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रदेशातील देशांच्या सरकारांना उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आल्याचेही ते म्हणाले. जगात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचे सर्वाधिक बळी जात आहेत, ही गोष्ट खरी असली तरी प्रदूषणामुळेही कषेरोगाचा विळखा वाढत चालल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. डब्ल्यूएचओने आग्नेय आशियातील बांगला देश, भूतान, उत्तर कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदिव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड या देशांतील सरकारांना प्रदूषणावर नियंत्रण आणण्याबाबत सुचविले आहे.

या प्रदेशातील अनेक शहरांमध्ये प्रदूषण वाढलेले आहे त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. या प्रदेशात असलेल्या देशांच्या सरकारने ही समस्या तात्काळ सोडविण्याचे भान बाळगण्याची गरज आहे, असे मत आग्नेय आशियातील डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक पूनमसिंग यांनी सांगितले. या भागातील व्यावसायिक धोका आणि पर्यावरणातील घटकांबाबत असणारी असुरक्षितता यामुळे कर्करोग आणि अकाली मृत्यू यांचे प्रमाण अधिक आहे.

सूर्याच्या प्रखर किरणांपासून कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसलेली आणि विविध कंपन्यांमधील कर्करोगाला कारणीभूत असलेली रसायने यामुळे या भागातील कामगारांमध्ये हा धोका अधिक बळावतो. त्यासाठीच कर्करोगावर होणा-या उपचार पद्धती आणि सेवा अखंडपणे सुरू ठेवताना कामगार वर्गाला त्या सेवांचा उपभोग घेता येईल अशा स्वरूपाची क्षमता उभारण्याची गरज आहे, असे पूनमसिंग यांनी सांगितले.