ट्विटरचा महिला सशक्तीकरणासाठी पुढाकार

twitter
नवी दिल्ली : पुरुषसत्ताक संस्कृती ऑनलाईन असो वा ऑफलाईन या दोन्ही ठिकाणी घट्ट रुजली असल्याचे एका अभ्यासावरुन लक्षात आल्यावर ट्विटरने एक अनोखे अभियान सुरु केले असून ट्विटरने महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी #PositionOfStrength अभियान सुरु केले आहे.

या अभियानाला ऑस्ट्रेलिया आणि आयरलँडमध्ये यापूर्वीच सुरुवात झाली असून हे अभियान आता भारतातही दाखल झाले आहे. या अभियानाने ऑनलाईन व्यासपीठावरील लैंगिक भेदभाव कमी करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. या त्याचबरोबर या अभियानासमोर महिला नेत्यांच्या दुसऱ्या पिढीला प्रभावशाली बनवण्यासाठी प्रेरणा देण्याचा उद्देश आहे.

याबाबत माहिती देताना ट्विटर इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख महिमा कौल यांनी सांगितले की, ट्विटरवर लैंगिक असमानता, घरगुती हिंसाचार, आरोग्य इत्यादींबाबत जागृती करण्यासाठी अभियाने चालवली जातात, असे आम्हाला कळले. अशा अभियानांना #PositionOfStrength मुळे नवी उमेद मिळेल आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल.

एफआयसीसीआय लेडीज ऑर्गनायझेशन आणि ऑब्झर्व्हर ऑफ रिसर्च फाऊंडेशनसोबत सोशल नेटवर्किंग मंचने भागीदारी केली आहे. ज्यामुळे ऑनलाईन व्यासपीठावर महिलांना आपला आवाज उठवता येणार आहे. शिवाय, मोठ्या आत्मविश्वासाने महिला संवाद साधू शकतील आणि समविचारी महिला जागतिक स्तरावरील महिलांशी जोडू शकतील.

Leave a Comment