नोकरी मागणारे नव्हे देणारे

jain
बंगळुर येथील अनिकेत जैन आणि आशिष अग्रवाल या दोघा मित्रांनी २००८ साली चांगली नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना नोकरी लागलीसुध्दा. हातात ऑर्डरसुध्दा पडली. परंतु जागतिक मंदी असल्यामुळे या दोघांनीही तूर्त नोकरीवर रुजू होऊ नये असे त्या ऑर्डरमध्ये लिहिले होते. योग्य त्या वेळी आपणास रुजू होण्याची तारीख कळवली जाईल असेही त्या ऑर्डरमध्ये म्हटले होते. हा वाट पाहण्याचा काळ या दोघांना फार जीवघेणा वाटायला लागला. त्यांनी या काळात आता आपण नोकरी मागायची नाही असे ठरवले आणि नोकरी मागणारे याचक न होता नोकरी देणारे दाते व्हावे असा निर्धार करून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

२००८ साली नोकरी मागणार्‍या या दोघांनी आता आपली सोल्यूशन्स इन्फिनी ही वेबसाईट तयार करणारी कंपनी उभी केली असून तिच्यात १०० लोकांना नोकर्‍या दिलेल्या आहेत. या दोघांची ही यशोगाथा कोणाही भारतीय तरुणाला विलक्षण प्रभावी करणारी आहे यात काही शंका नाही. हे दोघेही शिकत असताना त्यांनी आपल्या शिक्षणाचा एक भाग म्हणून वेबसाईट तयार केलेली होती आणि तिच्यात बरेच प्रयोगही केले होते. शाळेतील मुलांच्या पालकांना मुलांची प्रगती कळवणारे एसएमएस पाठवण्याविषयीची ही वेबसाईट होती.

आता नोकरी न मागता स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असा निर्धार या दोघांनी केला. तेव्हा त्यांनी आपल्या या कॉलेजमधल्या प्रोजेक्टचे रूपांतर व्यवसायात केले आणि वेबसाईट डेव्हलप करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांना दोन महिन्यांमध्ये बंगळुरच्या फूल विक्रेत्यांकडून वेबसाईट डिझायनिंगची ऑर्डर मिळाली. ती ५० हजार रुपयांची होती. ही ऑर्डर पूर्ण करण्याइतके तांत्रिक ज्ञान त्यांना होते. परंतु एवढी मोठी वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी ऑफिस घ्यावे लागणार होते. एकदोन कर्मचारी नेमावे लागणार होते. म्हणजे एकंदरीत भांडवलाची गरज होती.

या दोघांनीही घरातून, मित्रांकडून हातउसने घेऊन ४ लाख रुपये उभे केले. आशिष अग्रवालच्या कुटुंबीयांनी त्यांना एक छोटीसी जागा दिली आणि ही कंपनी सुरू झाली. नंतर पुढे या दोघांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. ही कंपनी २००९ सालपासून दरसाल २१० टक्के या वेगाने वाढत चालली आहे. २०१४ साली तिची उलाढाल ६८ कोटी रुपये झाली होती. येत्या २ वर्षात ही उलाढाल वाढवून १०० कोटी डॉलर्स करण्याचा त्यांचा विश्‍वास आहे. त्यांना जगभरातून ऑर्डर मिळत आहेत आणि केवळ एका कर्मचार्‍यावर सुरू झालेली ही कंपनी आता ११० जणांना नोकर्‍या देत आहे. तिच्या शाखा दिल्ली आणि हैदराबाद येथे काढण्यात आल्या आहेत.

Leave a Comment