नायजेरियातील निवडणुकांना गुजराथची अशी मदत

nijeria
निवडणुकांच्या तोंडावर मतदार राजाला खूष करण्याची म्हणजे पैसे साड्या वाटण्याची प्रथा फक्त भारतातच असावी असा आपला समज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. जगातील बहुतेक सर्व देश मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर अशी आमिषे दाखवितात व त्याला आफ्रिकेतील गरीब नायजेरिया देशही अपवाद नाही. तेथेही सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून त्यासाठी गुजराथेतून मतदारांना वाटण्यासाठी प्रचंड प्रमाणावर कपडा मागविला गेला आहे.

गुजराथेतील राजकोटजवळच्या जैतपूर येथील प्रिंटींग व्यावसायिकांकडे लाखो मीटर साड्या प्रिंटींगसाठी आल्या आहेत. कॉटन साडीवर प्रिंटींगसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. येथे प्रिंटींगचे ५ हजारांवर कारखाने आहेत. त्यातील १५०० युनिट निर्यातदार आहेत. गेल्या दशकापासून येथे परदेशातूनही प्रिंटींगच्या ऑर्डर्स येतात. नायजेरियातून आलेली ऑर्डर ही पहिली नाही मात्र ती खूप मोठी आहे. येथील ३० प्रिंटींग युनिटना या साडीचा कपडा प्रिंट करून निर्यात करायचा आहे. या कपड्यावर नांयजेरियातील राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा फोटो, त्याचे निवडणूक चिन्ह छापले गेले आहे. असा साधारण ३० लाख मीटर कपडा निर्यात होणार आहे.

नायजेरियातील महिला साड्या नेसत नाहीत मात्र त्या साडीप्रमाणे किटँगो नावाचे वस्त्र गुंडाळतात. ५ मीटर लांब ३ फूट रूंदीचे हे कापड असते. जैतपूर येथून निर्यात होणार्‍य कपड्यातून अशी किटँगो तयार केली जातील व कांही कापड बॅनरसाठी वापरले जाईल असे समजते.

Leave a Comment